पुण्यात गौतमी पाटीलच्या आडनावाच्या वादावरून नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत गौतमीचे आडनाव पाटील नसल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही’, असा थेट इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आता गौतमी पाटीलच्या आडनावरून नवा वाद उभा राहिला आहे.
दरम्यान, गौतमी पाटीलने याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आपल्या आडनावाच्या वादावर गौतमी काय बोलणार याकडे लक्ष लागेल आहे. गौतमी पाटीलचा गुरुवारी सांयकाळी सात वाजता विरारमध्ये एक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमानंतर गौतमी पाटील या सगळ्या वादावर माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे. त्यामुळे गौतमीच्या प्रतिक्रियेनंतर हा वाद आणखी चिघळणार की याला नवं वळण मिळणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
आपल्या नृत्यामुळे आणि अदाकारीमुळे अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटीलच्या मागचे वाद काही थांबायचं नाव घेत नाहीत. सुरवातीला गौतमी पाटीलच्या नृत्याला आक्षेप घेण्यात आला. त्यावर मराठी सिनेक्षेत्र ते लावणी कलाकारांपर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया देत गौतमीचा विरोध केला. गौतमीचे नृत्य अश्लील असल्याचा थेट आरोप तिच्यावर आरोप केला. त्याबद्दल लगोलग गौतमीने दिलगिरी देखील व्यक्त केली. इतकंच नाही तर आपल्या नृत्यातही बदल केला. त्यानंतरही तिच्यावर टीका होतच आहे.
मध्यंतरीच्या काळात गौतमीच्या मानधनावरून वाद झाला. खुद्द इंदोरीकर महाराजांनी तिच्या मानधनावरून तिच्यावर टीका केली. ते होत नाही तोच गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ कुणी तरी शूट करून व्हायरल केला. त्यामुळे गौतमी पुरती कोलमडली होती. पण तरीही तिने हिंमत हारली नाही पुन्हा नव्या जोमाने उभी राहिली. आता पुन्हा गौतमीच्या मागे आणि एक शुक्लकाष्ठ लागलं आहे. तिचा कार्यक्रमच होऊ न देण्याचा पुन्हा इशारा देण्यात आला आहे. तेव्हा या वादाला गौतमी पाटील कसं तोंड देते, हे पाहणं महत्वाचे आहे.