मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी – भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC)- ने ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीची लिस्टिंग होऊन एक वर्ष झाले असून गेल्या तिमाहीत कंपनीने उत्कृष्ट निकाल नोंदवले. मार्च २०२३ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा जवळपास पाच पटीने वाढला मात्र, कमाईच्या बाबतीत त्यांना नुकसान सहन करावं लागलं आहे आणि एलआयसीच्या निव्वळ उत्पन्नात घट नोंदवली गेली आहे. दरम्यान, LIC च्या तिमाही निकालांनंतर कंपनीच्या शेअर्सनी बाजारात तेजीची वाट धरली.

LIC शेअर लिस्टिंगला एक वर्ष
गेल्या वर्षी १७ मे २०२२ रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या एलआयसीचा नफा २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत १३,४२८ कोटी रुपये होता. तर अलीकडेच एलआयसीने जाहीर केलेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, विमा कंपनीचे निव्वळ प्रीमियम उत्पन्न ८% कमी होऊन १.३१ लाख कोटी रुपये झाले, जे एक वर्षापूर्वी १.४३ लाख कोटी रुपये होते. याशिवाय संपूर्ण आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी एलआयसीचा निव्वळ नफा ३५,९९७ कोटी रुपये झाला, जो २०२१-२२ मध्ये फक्त ४,१२५ कोटी रुपये होता.

LICच्या गल्ल्यात तीन दिवसात भरले ६२०० कोटी, कुठून आला पैसा?
एलआयसी लाभांशची घोषणा
चौथ्या तिमाहीतील जबरदस्त निकालांच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचाही खिसा भरला आणि प्रति शेअर ३ रुपयेचा लाभांशही जाहीर केला. लक्षात घ्या की गेल्या वर्षी LIC ने देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO आणला होता आणि याद्वारे बाजारातून २१,००० कोटी रुपये उभे केले होते. परंतु शेअर बाजारात स्टॉक्सची लिस्टिंग अतिशय खराब झाली आणि गेल्या एका वर्षात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना ३५% नकारात्मक परतावा दिला.

अदानींच्या शेअर्सचा धमाका! या गुंतवणूकदाराने १०० दिवसात कमावले ७६८३ कोटी रुपये, पाहा कोण आहे
लिस्टिंगपासून एलआयसीला इतके नुकसान
गेल्या वर्षी बाजारात सूचिबद्ध झाल्यापासून शेअर्समध्ये पडझड सुरूच राहिली आणि यामुळे कंपनीचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) एका वर्षात सुमारे २ लाख कोटी रुपयांनी कमी झाले. चौथ्या तिमाहीत नफा वाढण्यामागे कंपनीच्या गुंतवणूक उत्पन्नाचा मोठा हात आहे. जानेवारी ते मार्च २०२३ दरम्यान LIC ने गुंतवणुकीतून परतावा म्हणून ६७,८४६ कोटी रुपये कमावले. तर या कालावधीत कंपनीचे निव्वळ कमिशन ५% वाढून ८,४२८ कोटी रुपये झाले आहे.

गुंतवणूक करताय… हे लक्षात घ्या!

निकालानंतर शेअर्समध्ये उसळी
एलआयसीचा चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही दिसून येत आहे. गुरुवारी मार्केट उघडल्यानंतर एलआयसीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळत. सकाळी ९.२८ वाजता एलआयसी शेअर २.२१% वाढून ६०७.३५ रुपयांवर व्यवहार करत होता. तर बुधवारीच्या व्यवहार दिवशी, स्टॉक बीएसईवर ०.६१% वाढीसह ५९३.५५ रुपयांवर क्लोज झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here