Kalyan Doctor Saved Life Of Construction workers After Accident; हा तर चमत्कारच! लिव्हर, किडनी आणि आतड्यांना भेदून बांबू आरपार घुसला, पण तरीही तरुणाचा जीव वाचला
कल्याण : मृत्यूच्या दारातून रुग्णाला परत आणणाऱ्या डॉक्टरांना आपल्याकडे अनेकजण देवाची उपमा देतात किंवा देवदूत असं संबोधतात. या शब्दांचा प्रत्यक्ष अनुभव कल्याणमधील एका गरीब कामगाराला आला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या या कामगाराला कल्याणच्या आयुष रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने तब्बल ९ तास शर्थीचे प्रयत्न करत अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं आहे.बांधकाम क्षेत्रात अनेकदा अपघात घडत असतात. कल्याणमध्ये सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणीही अशीच मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत रोजंदारीवर काम करणारा कामगार गंभीर जखमी झाला. इमारतीचे काम सुरू असताना उंचीवरून खाली कोसळताना टोकदार बांबू त्याच्या पोटाच्या उजव्या कुशीतून लिव्हर, किडनी आणि आतड्यांमधून आरपार बाहेर निघाला. त्यावेळी इतर कामगार आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकाने क्षणाचाही विलंब न करता या कामगाराला जवळच्याच आयुष हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आयुष्यभर जे स्वप्न उराशी बाळगलं ते जग सोडल्यानंतर ८ दिवसांनी पूर्ण झालं; पोलिसाला मृत्यूनंतर PSI म्हणून बढती
रुग्णालयात आणले त्यावेळी सदर कामगाराची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने आयुष हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू करून रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवत तातडीने आपत्कालीन शस्त्रक्रियाही केली. तब्बल ८ ते ९ तास ही शस्त्रक्रिया करत या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवले. शस्त्रक्रियेनंतर या रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. तिथं अतिदक्षता विभागातील टीमने प्रयत्नांची अक्षरशः पराकाष्टा करत या कामगाराला जीवदान दिले. सध्या हा रुग्ण स्वतःच उठून बसत आहे, व्यवस्थित बोलत आणि खात असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. रुग्णालयातील डॉक्टर आणि प्रशासनाने केलेल्या या कामगिरीचे कल्याणकरांकडून कौतुक केलं जात आहे.