कल्याण : कल्याण पूर्वेतील खरड गावात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नावाने आमदार केसरी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बक्षीस वितरणादरम्यान गदा चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आयोजकांनी चोरलेल्या गदा परत करण्याचे आवाहन केले होते. पण चोरट्यांनी चोरलेल्या गदा परत केल्याच नाहीत. आयोजकांनी आवाहन केलेला व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चांदीच्या गदांसह सायकल आणि बाइकही बक्षिसाच्या स्वरूपात देण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या.पावसाळ्याआधी बैलगाडा शर्यतींचा अंतिम टप्पा ग्रामीण भागात सुरू आहे. मलंगगड भागातील खरड गावात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नावाने आमदार केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या स्पर्धेत बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेल्या १० ते १२ गदा चोरीला गेल्या आहे. शर्यतीवेळी आयोजकांनी केलेल्या आवाहनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरला आणि गदा चोरीचा प्रकार उघड झाला.
कल्याणजवळ मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या खरड गावात बुधवारी या बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. काकडवाल गावातील निलेश कान्हा पावशे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी बैलगाडा शर्यतीच्या स्टेजवरून दहा ते बारा लाखो रुपयांच्या गदा चोरीला गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र या बाबत अद्याप हिललाईन पोलिसात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

रात्री उशिरापर्यंत स्पर्धा सुरू
ही स्पर्धा सुरू होण्यास काहिसा उशीर झाल्याने रात्री उशिरापर्यंत स्पर्धा सुरू होती. रात्रीच्या अंधाराचा फायदा चोरट्यांनी घेतला. आणि थेट मंचावरून बक्षिसांच्या रुपात ठेवलेल्या गदांवर चोरट्यांनी हात साफ केला. या गदा लाखोंच्या किंमतीच्या होत्या. आणि चोरट्यांनी त्यावर डल्ला मारला. स्पर्धेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. तसेच आयोजक, कार्यकर्ते यांची उपस्थिती असतानाही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.