आधीच विवाहित होती मौसमी दत्ता…
जोडप्याने सांगितले की, मौसमी दत्ता हीचं आधीच लग्न झालं होतं. तिला दोन मुलेही आहेत. मौसमीने दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती तिला रोज मारहाण करायचा. त्यामुळे दोन्ही मुलांना घेऊन ती पतीपासून वेगळी झाली. यानंतर तिच्या आयुष्यात मौमिता आली आणि आयुष्यात जगण्याचा अर्थच बदलला. सगळ्यात विशेष म्हणजे मौमिता हिने मौसमीच्या दोन्ही मुलांचाही स्वेच्छेने स्वीकार केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ मे २०२३ मौसमी दत्ता आणि मौमिता चॅटर्जी हे हळदी, संगीत, मेहंदी असे सर्व कार्यक्रम करत बंगाली विधी पूर्ण करत लग्नाच्या बंधनात अडकले. कोलकात्याच्या प्रसिद्ध भूतनाथ मंदिरात दोघांनी लग्नाची गाठ बांधली. १९ वर्षीय मौमिता आणि मौसमी या दोघांनी अगदी पारंपारिक कपडे घालून लग्नाचा पवित्र क्षण अनुभवला. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे.
मौमिता वराच्या रुपात मंदिरात वाट पाहत होती. यानंतर मौसमी ही वधूच्या रुपात तिथे पोहोचली. यानंतर दोघांचाही सुंदर असा विवाहसोहळा पार पडला. खंरतर, एलजीबीटी समाजासाठी हे लग्न म्हणजे एक आशेचा किरण आहे. सुचंद्र दास आणि श्री मुखर्जी हे २०१८ मध्ये लग्न करणारे शहरातले पहिले समलिंगी जोडपे होते. यानंतर आता या दोघांनीही आपल्या प्रेमाची साथ देत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
प्रेमकथेला कशी झाली सुरुवात?
कोलकाता इथल्या २५ वर्षीय मौसमी दत्ता काही महिन्याआधी इन्स्टाग्रामवर मौमिता मजुमदारच्या संपर्कात आली. दोघींमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू दोघी एकत्र आल्या. त्यानंतर रोज फोनवर बोलणं वाढलं, भेटीगाठी वाढल्या. यानंतर एकदा मौमिताने मौसमीसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. यावर तिने होकार दिला आणि दोघींच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली.
यावर मौमिताने मीडियाशी बोलताना सांगितलं की, ‘कधीही भेदभाव करू नये. जर भिन्नलिंगी जोडपी लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहू शकतात. तर समलिंगी जोडपी का नाही राहू शकत. प्रत्येकाला आपल्या प्रिय आणि आवडत्या व्यक्तीसोबत राहण्याचे जीवनातले सुख अनुभवता आले पाहिजे.’
प्रेम म्हणजे प्रेम असतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. जोडीदार आपल्यावर प्रेम करतो पण त्याचे कुटुंब आपल्यावर प्रेम करेल की नाही, अशी आशा असलेली मौसमी म्हणते की, जेव्हा प्रेमात पडण्याची वेळ येते तेव्हा लिंग हा फारसा महत्त्वाचा घट नसतो. प्रेमामध्ये फक्त हृदय ऐकमेकांशी जोडलं जातं.
भारतात २०१८ मध्ये समलैंगिकतेला गुन्हेगारीच्या क्षेणीतून बाहेर काढण्यात आले असले तरी आजही यासाठी विरोध होताना दिसतो. अशात कोलकातामध्ये पार पडलेला हा अनोखा विवाहसोहळा सगळ्यांसाठी एक उत्तम उदाहरण आहे.