महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) बांधत असलेल्या एकूण ७०१ किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचा ५२० किमीचा पहिला टप्पा नागपूरजवळील शिवमडका ते शिर्डीजवळील कोकणठामपर्यंत डिसेंबरमध्येच सुरू झाला. त्यानंतर आता दुसरा टप्पा कोकणठामपासून ११ किमी अंतरावरील चंदेकासरे या गावातील शिर्डीसाठीच्या आंतर बदलापासून सुरू होत आहे. तिथपासून इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्दपर्यंत हा ८२ किलोमीटर लांबीचा मार्ग आहे.
या दुसऱ्या टप्यात सिन्नर येथील गोंदे इंटरचेंज येथून नाशिक, अहमदनगर, पुणे व त्या भागातील इतर गावांसाठी या महामार्गाचा उपयोग होणार आहे. भरवीर आंतरबदलापासून घोटी (ता. इगतपुरी) हे जवळपास १७ किमी अंतरावर आहे. यापासूनच नाशिक, ठाणे, मुंबई येथून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास जलद होणार आहे. या टप्यात अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एकूण ७ गावातील ११.१४१ किमी मार्गाचा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यातील ६८.०३६ किमी मार्गाचा समावेश आहे. त्यामध्ये सिन्नर तालुक्यातील एकूण २६ गावातील ६०.९६९ किमी व इगतपुरी तालुक्यातील पाच गावातील ७.०६७ किमी, असा हा टप्पा आहे. पॅकेज – ११ अंतर्गत कोकमठाण (ता. कोपरगाव, जि. अहमदनगर), पॅकेज – १२ अंतर्गत गोदे (ता. सिन्नर, जि. नाशिक) व पॅकेज- १३ अंतर्गत एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालय (भरवीर, ता. इगतपूरी, जि. नाशिक) या आंतरबदलाचा समावेश आहे.
६०० किमीहून अधिक ‘समृद्धी’मार्गस्थ
एकूण ७०१ किमीपैकी ५२० किमीचा मार्ग डिसेंबरमध्ये सुरू झाल्यानंतर आता शुक्रवारी ८२ किमीचा मार्ग सुरू होत आहे. हा ८२ किमी लांबीचा मार्ग समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्रमांक ११, १२ आणि १३ चा भाग आहे. प्रकल्पाच्या या दुसऱ्या टप्प्याचा खर्च ३२०० कोटी रुपये आहे. या टप्याच्या उद्घाटनानंतर समृद्धी महामार्ग एकूण ६०२ किलोमीटरसाठी खुला होईल.
… असा आहे मार्ग
– या मार्गावर एकूण सात मोठे पूल, १८ छोटे पूल, वाहनांसाठी ३० भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग आहेत.
– याच अवघ्या ८२ किमी मार्गावर तब्बल तीन पथकर प्लाझा अर्थात टोल नाके आहेत.
– या पथकर प्लाझावर तीन आंतर बदल आहेत.
– पथकर गोळा करण्यासाठी एकूण ५६ टोल केंद्र आहेत.
– याखेरीज सहा वे ब्रीज (अवजड वाहनासाठीचे रॅम्प) या सुविधांचा समावेश