म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: ‘ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे प्रमुख नेते देशासाठी एकत्र आले होते. हे सारे उल्लेखनीय आहे’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधी पक्षांना लक्ष्य केले. आम्ही करूणेने प्रेरित असल्याने आमच्या शत्रूंचीही काळजी घेतो, असा चिमटा त्यांनी काढला.

तीन देशांच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर मोदी यांनी आपल्या पहिल्याच भाषणात नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधी पक्षांवर अप्रत्यक्ष टीका केली. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे जावा, असे विरोधी पक्षांचे म्हणणे असून त्यासाठी २० विरोधी पक्षांनी या उद्घाटन समारंभावर बहिष्कारास्त्र उगारले आहे. तर शिवसेनेसह १७ पक्षांनी या कार्यक्रमाला पाठिंबा दिला आहे. बसपा प्रमुख मायावती यांनी नवीन संसदेच्या उद्घाटनाला पाठिंबा व शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र आपण व्यक्तिगत कारणांमुळे रविवारच्या कार्यक्रमाला हजर राहू शकणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. गुरुवारी सकाळी मोदी दिल्ली विमानतळावर उतरताच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. ‘ऑस्ट्रेलियातील कार्यक्रमाला केवळ पंतप्रधान अँथनी अल्बानीजच प्रेक्षकांमध्ये नव्हते तर त्या देशाचे माजी पंतप्रधान आणि संपूर्ण विरोधक एकत्र आले होते. करोना संकटावेळी जगभरात पाठवण्यात येणाऱ्या लशीवरून प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण लक्षात ठेवा ही बुद्धाची, गांधीजींची भूमी आहे! आम्ही आमच्या शत्रूंचीही काळजी घेतो, आम्ही करुणेने प्रेरित आहोत’, असे ते यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.

‘आकलन शक्तीपलीकडे…’

संसद उद्घाटनावरून विरोधकांशी तार्किक वादविवाद करणे आकलनशक्तीच्या पलीकडचे असल्याची टीका केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुवारी केली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कोणत्याही घटनात्मक पदावर नसताना यूपीए काळात मणिपूर, तमिळनाडू विधानसभांची विस्तारित भवने व इतर ठिकाणी उद्घाटने केली होती. अशा १५ प्रसंगी तत्कालीन राष्ट्रपती वा राज्यपालांना दुर्लक्षित केले गेले होते, असे ते म्हणाले.

मोदींच्या पाया का पडले? पापुआ न्‍यू गिनीच्या PM ने स्वत:च सांगितलं, वाचून तुम्हीही म्हणाल ‘क्या बात हैं..!’

‘मन मोठे करा’

‘पंतप्रधानांचीही घटनात्मक जबाबदारी आहे. काँग्रेसने आपले मन मोठे केले तर बरे होईल. पंतप्रधानांची घटनात्मक जबाबदारीही तेवढीच आहे. संसद हा लोकशाहीचा मुकूट आहे. सध्याच्या संसदेच्या मर्यादा लक्षात घेता नव्या इमारतीची गरज आहे. २०२६ पर्यंत संसदेची सदस्यसंख्या वाढविण्यास बंदी आहे. पण त्यानंतर खासदारांची संख्या सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाढवावीच लागेल. अशा स्थितीत भारताने तयार केलेली संसद भारतीयांना का मिळू नये? मुघलांनी लाल किल्ला, जामा मशिद बांधली. ब्रिटिशांनी राष्ट्रपती भवन, नॉर्थ व साऊथ ब्लॉक, संसद भवन तयार केले. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत आपण काय केले, याचे उत्तर काँग्रेसने आधी द्यावे’, असे नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाच्या वादावर माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले.

मोदींनी उद्घाटन केल्यानंतर दोनच दिवसांत वंदे भारतमधून पाणी थेंब थेंब गळं? काय खोटं, काय खरं?

खर्गेंचा हल्लाबोल

नवीन संसदेच्या पंतप्रधानांकडून होणाऱ्या उद्घाटनाला विरोधकांचा तीव्र विरोध कायम आहे. ‘मोदीजी, संसद हे जनतेने स्थापन केलेले लोकशाहीचे मंदिर असून राष्ट्रपतींचे कार्यालय हे संसदेचा पहिला भाग आहे. तुमच्या सरकारच्या अहंकारी उद्दामपणाने संसदीय व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. १४० कोटी भारतीयांना जाणून घ्यायचे आहे की, संसद भवनाच्या उद्घाटनाचा राष्ट्रपतींचा अधिकार काढून घेऊन तुम्हाला काय सांगायचे आहे’, असे ट्वीट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here