गुरुवार बाग परिसरामध्ये तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराज यांनी दत्ताच्या वाड्याचे बांधकाम केले होते. हा परिसर तब्बल आठ एकर होता. पैकी साडेचार एकर वर आता विविध इमारतींचे अतिक्रमण झाले आहे. उरलेल्या साडेतीन एकरच्या जागेला वाचवण्यासाठी इतिहास प्रेमींची धडपड सुरू आहे .
जिल्हा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अरबाज शेख यांना सदर वाड्याच्या जागेमध्ये नगरपालिकेने समाज मंदिराला परवानगी दिल्याचे समजले. या कामाला त्यांनी हरकत घेत याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले होते, तसेच त्यांनी या प्रकाराची कल्पना खासदार उदयनराजे भोसले यांना दिली. उदयनराजेंनी तात्काळ गुरुवारी गुरुवार भाग येथील तक्ताच्या वाडा परिसराला भेट दिली. यावेळी रवींद्र झुटिंग, माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के जिज्ञासा विकास मंच निलेश पंडित, अरबाज शेख इत्यादी उपस्थित होते. सदर जागेची पाहणी करून खासदार उदयनराजे भोसले यांनी हे समाज मंदिराचे काम तात्काळ थांबवावे ,असे स्पष्ट सूचना दिल्या.
या पाहणी दरम्यान येथे १७ व्या शतकातील एक ऐतिहासिक रांजण आढळून आला आहे. हा रांजण मातीमध्ये अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आहे. यावरूनच या जागेचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात येते असे असताना मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनीही परवानगी दिलीत कशी? असा खडा सवाल सुहास राजे शिर्के यांनी केला आहे.
शिवाजी संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी सुद्धा या जागेची पाहणी केली. या रांजणावर संशोधन केल्यानंतर त्यांच्या अधिक तपशील उजेडात येतील असे त्यांनी सांगितले. ऐतिहासिक तक्ताच्या वाडा परिसरात बांधकामांना परवानगी मिळते कशी? अशी खासगी बांधकामे करून जर ऐतिहासिक ठेवा नष्ट केला तर त्याचे परिणाम वाईट होतील. या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.