मुंबई: सत्तेत आल्यामुळे लोकांची कामं करा. आणखी दहा वर्षे सत्ता कशी टिकेल या दृष्टीने विचार करा. बदल्यांच्या भानगडीत पडू नका. कोणत्याही प्रलोभनांपासून दूर रहा, असा कानमंत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांना आज दिला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

काँग्रेसच्या मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. सुमारे तीन तास ही बैठक चालली. या बैठकीत मंत्र्यांनी काय करावे आणि काय करू नये यावर मार्गदर्शन करण्यात आलं. भाजप हा प्रबळ विरोधी पक्ष आहे. त्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोणतीही चुकीची गोष्ट करू नका. पक्षाची आणि स्वत:ची प्रतिमा जपा, असा कानमंत्रही या बैठकीत देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. जनतेची जास्तीत जास्त कामे करण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीतील दोन्ही मित्र पक्षांशी समन्वय साधण्याबाबतही या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आलं.

प्रशासकीय यंत्रणा, मंत्रालयीन कामकाज आणि पक्षवाढी संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर आपआपल्या जिल्ह्यात सर्व पालकमंत्र्यांनी काय काय काम केलं पाहिजे, याची जंत्रीही या मंत्र्यांना देण्यात आली. तुम्हाला अडकवण्यासाठी सापळाही रचला जाऊ शकतो. त्यासाठी प्रलोभने दिली जाऊ शकतात. अशा प्रलोभनांना बळी पडू नका, असा कानमंत्रही देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. अडचणी उद्भवल्यास अनुभवी आणि वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आल्याचं समजतं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here