सांगली: कृष्णा नदीतून पुढे कर्नाटकात वाहून जाणा-या पाण्यापैकी काही पाणी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दुष्काळी भागात पोहोचवण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतला आहे. सोमवारपासून टेंभू आणि म्हैसाळ या योजनांद्वारे पाणी उपसा सुरू होणार आहे. यामुळे दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासह सांगली जिल्ह्यातील पुरावरही नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

सातारा, आणि सांगली जिल्ह्यातील पावसाचे शेकडो टीमएमसी पाणी कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पुढे कर्नाटकात वाहून जाते. पावसाळ्यात यातील काही पाणी दुष्काळी भागात वळवावे, अशी मागणी गेल्या २५-३० वर्षांपासून सुरू आहे. अखेर या मागणीला मूर्त रूप आले असून, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कृष्णेचे पाणी दुष्काळी भागात वळवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना देण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील टेंभू आणि सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनांद्वारे पाण्याचा उपसा केला जाणार आहे. उपसलेले पाणी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील तलावांमध्ये सोडले जाईल. कडेगाव, तासगाव, विटा, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, सांगोला, मंगळवेढा या परिसरातील तलावांमध्ये कृष्णेचे पाणी पोहोचणार आहे. पावसाळ्याच्या अखेरपर्यंत पाणी उपसा सुरू राहील. या निर्णयामुळे दुष्काळी भागातील पाणी टंचाईचे संकट कमी होणार आहे.

वाचाः

पावसाळ्यात कृष्णेतील पाणी उपसा करण्यामुळे सांगली जिल्ह्यातील पुराचा धोका कमी होणार आहे. कोयना धरणातून सध्या ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय वारणा आणि राधानगरी धरणातून होणा-या विसर्गामुळे सांगलीत कृष्णा नदीची पूरस्थिती गंभीर बनते. यातच कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याता विसर्ग कमी केल्यास सांगलीतील स्थिती आणखी कठीण बनते. पूरकाळात कृष्णेतील उपसा सुरू राहिल्यास पूर नियंत्रणासाठीही याची मोठी मदत होणार आहे.

वाचाः

कृष्णा नदीवरील टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या तीन योजनांमधून दुष्काळी भागातील शेतीसाठी पाणी दिले जाते. याच योजनांमधून पावसाळ्यात दुष्काळी भागातील तलाव भरावेत, असा आग्रह दुष्काळी भागातील नागरिकांकडून नेहमीच सुरू होता. मात्र, पाणी उपसा करण्याच्या खर्चावरून याबाबत निर्णय प्रलंबित होता. अखेर जलसंपदा मंत्र्यांनी हा निर्णय घेऊन दुष्काळी भागाला दिलासा देण्यासह पूरस्थिती नियंत्रणासाठीही महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

दुष्काळी भागातील नागरिकांकडून निर्णयाचे स्वागत
तलाव भरण्याच्या निर्णयामुळे दुष्काळी भागातील विहिरी आणि कूपनलिकांची पाणी पातळी वाढणार आहे. याचा फायदा शेतीसाठी होणार आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे येणा-या काळात दुष्काळी भागात सिंचन वाढणार असल्याने स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

Leave a Reply to แผ่นกรองหน้ากากอนามัย Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here