खासदार बाळू धानोरकर मागील काही दिवसापासून माध्यमात चर्चेत आहेत. रावत गोळीबार प्रकरणातील आरोपी सोबतचे धानोरकर यांचे फोटो समाज माध्यमात तुफान व्हायरल होत आहेत. अशातच आता खासदार धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ प्रवीण काकडे यांना ईडीने नोटीस पाठविली आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही नोटीस पाठविली आहे. सदर पत्रात पीएमएलए अधिनियम अंतर्गत चौकशी करण्यात येणार असा उल्लेख आहे. आठ मे ला ईडीने नोटीस पाठविली आहे. जिल्हातील भद्रावती व आजूबाजूच्या पोलिस ठाण्यात काकडे यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार दाखल असल्याचे म्हटले आहे. तसेच ईडीकडे सुध्दा काकडे यांच्याविरोधात तक्रार दाखल आहे.
त्यामुळे ईडीचे उप संचालक संजय बंगारतळे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्र परदेशी यांना पत्र पाठवून गुन्ह्याबाबतचे दस्ताऐवज व ईडीच्या पथकाला आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळे चंद्रपूरातसुध्दा आता ईडीची एन्ट्री होणार आहे.असे असले तरी अद्याप ही नोटीस जिल्हा पोलीस अधीक्षकाना मिळालेली नाही. त्यापूर्वीच ईडीने पाठविलेली नोटीस समाज माध्यमात वायरलं झाली आहे.त्यामुळे या नोटीस बाबत चर्चा रंगली आहे.