अफजल अमीर पाशा (वय २७, रा. धर्माबाग, नांदेड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील एका महिलेसोबत आरोपीचे प्रेमसंबंध होते. मात्र, त्या महिलेने लग्नासाठी नकार दिल्यामुळे तिचा गळा आवळून जानेवारी २०२० मध्ये खून केला होता. त्यानंतर आरोपी पळून पुण्यात आला होता. सुरवातील मिळेल ते काम केले. नंतर पुण्यात रविवार पेठेत एका बांधकाम साईटवर काम करत होता. त्याला मराठी चांगली येत होती. त्यामुळे काहीच अडचण नव्हती. तेलंगणा पोलिस त्याचा शोध घेत होते. त्यावेळी तो पुण्यात रविवार पेठेत असल्याचे त्यांना समजले. त्यांनी पुण्यात येऊन खडक पोलिसांना मदत मागितली.
रविवार पेठ हा गर्दीचा परिसर असल्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण होते. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, उत्तम चक्रे, सहायक निरीक्षक सुशिल बोबडे यांच्या पथकाने आरोपीचा फोटो घेऊन त्याचा शोध सुरू केला. खडक पोलिसांचे पथक रविवार पेठेत दोन ते अडीच तास फिरून फोटो दाखवत त्याचा शोध घेत होते. शेवटी तो एका बांधकाम साईटवर राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला त्या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतले. खडक पोलिस ठाण्यात स्टेशन डायरीला नोंद करून त्याला तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times