म. टा. प्रतिनिधी, नगरः नगरमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज पाचशेपेक्षा जास्त करोना बाधित आढळत आहेत. त्यातच गणेशोत्सव अवघ्या एका आठवड्यावरून येऊन ठेपला आहे. मात्र, करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाचा गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय नगर शहरातील अकरा मानाच्या गणपती मंडळांनी घेतला आहे. यंदा प्रथमच गणपती विसर्जन मिरवणून न काढण्याचा मोठा निर्णयही या मंडळांनी घेतला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील अकरा मानाच्या गणपती मंडळांची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीस शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर, पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके, शिवसेना माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मनेष साठे, स्वप्नील घुले, ऋषीकेश कावरे आदिंसह माळीवाडा परिसरातील मानाच्या गणपती मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

करोनाच्या अनुषंगाने गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करावा, याबाबत या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये मानाच्या मंडळांनी हा उत्सव चार भिंतीच्या आतमध्येच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरमधील करोना विषाणुची प्रादुर्भावाची परिस्थिती पाहत सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. गणेशोत्सव काळात मंडळांकडून कोणत्याही प्रकाराचे कार्यक्रम घेण्यात येणार नाहीत. गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील वर्षी करोनाचे संकट दूर झाल्यावर मोठ्या स्वरुपात गणेशोत्सव साजरा करण्याचे यंदा जाहीर करण्यात आले आहे.
या बैठकीस संगम तरुण मंडळ, माळीवाडा तरुण मंडळ, आदिनाथ तरुण मंडळ, दोस्ती मित्र मंडळ, नवजवान तरुण मंडळ, महालक्ष्मी तरुण मंडळ, कपिलेश्वर मित्र मंडळ, नवरत्न मित्र मंडळ, समझोता तरुण मंडळ, निलकमल मित्र मंडळ, शिवशंकर तरुण मंडळाचे पदाधिकारीही उपस्थित होते.

मिरवणूक रद्द करण्याची पहिलीच घटना – आगरकर

‘गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक रद्द करण्याची ही पहिलीच घटना आहे,’ अशी माहिती ग्रामदैवत विशाल गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर यांनी दिली. ते म्हणाले, ‘नगरमध्ये दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आम्ही परंपरा बाजुला ठेऊन विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. विसर्जन मिरवणूक रद्द होण्याची ही आतापर्यंत झालेल्या गणेशोत्सव काळातील पहिलीच घटना आहे.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here