सुनील दिवाण, पंढरपूरः प्रकशाळ पूजेतील वादानंतर मंदिराचे कार्यकारी अधिकारी , व्यवस्थापक याना आता विठ्ठल गाभाऱ्यात पुन्हा प्रवेश खुला करण्यात आला आहे. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या खुलाशास समितीचे समाधान झाले असून या अधिकाऱ्यांवरील गाभारा बंदी उठवण्यात आली आहे. या बैठकीचा सर्व अहवाल विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात येणार आहे .

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह-भ-प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे मंदिर समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, सदस्य संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, साधना भोसले यांच्यासह अन्य सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

आषाढी यात्रा २०२० मध्ये श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा ९ जुलै २०२० रोजी रूढी व परंपरेनुसार संपन्न झाली. या पूजेच्या बाबतीत काही तक्रारी आल्या नंतर मंदिर समितीने सभा घेवून, मंदिराचे अधिकारी व कर्मचारी यांना गाभारा बंदीची कारवाई केली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबत मंदिर समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मंदिर समितीच्या अध्यक्षांनी जाहीर केले होते.

त्यानुसार बैठकीमध्ये प्रक्षाळ पूजेच्या विषयावर चर्चा करण्यात आले. यासंदर्भात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे म्हणणे जाणून घेतले आहे. त्या बाबतचा अहवाल विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर अधिकारी व कर्मचाऱ्यांना करण्यात आलेली विठ्ठल मंदिरातील गाभारा बंदी देखील मागे घेण्यात आली असल्याचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

काय होता वाद

प्रकशाळ पूजेच्यावेळी देवाची गाभाऱ्यात पूजा सुरू असताना एक कर्मचाऱ्याने कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या अंगावर पाण्याचा तांब्या ओतला होता. देवाचे स्नान सुरू असताना आशा पद्धतीने अधिकारी कर्मचाऱ्याने गाभाऱ्यात पाणी अंगावर घेतल्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडने यास आक्षेप घेतल्यावर समितीने या अधिकारी व काही कर्मचाऱ्यांना गाभाऱ्यात जाण्यास प्रतिबंध केला होता. यानंतर कर्मचारी संघटना आक्रमक होऊन त्यांनी काम बंदचा इशारा दिल्यावर समितीने अधिकारी कर्मचाऱ्यांचा खुलासा घेत गाभारा बंदी मागे घेतली आहे. विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्यांवर संपूर्ण मंदिराची कायदेशीर जबाबदारी असते त्यांनाच इतके दिवस गाभाऱ्यात प्रवेश नसल्याने सर्व व्यवस्था विठ्ठल भरोसेच सुरू होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here