या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, राजेश रामवृक्ष याने या भागातील एका दारू विक्रेत्याला हल्लेखोरांची चुगली केली होती. त्याचा राग हल्लेखोरांना आला होता. आरोपींनी राजेश रामवृक्ष याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोनारपाड्यातील साईश्रध्दा इमारतीमध्ये आरोपींनी राजेशला बोलावून घेतले. तेथे त्याच्याशी तू दारु विक्रेत्याला आमची चुगली का केली, असा जाब विचारला. यावरून वाद घालून राजेश रामवृक्ष याला खोलीमध्ये कोंडून लाकडी दांडक्याच्या साह्याने बेदम मारहाण केली. आरोपी दादू पाटील आणि विनोद पडवळ यांनी राजेशच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केले. राजेश याने बचावासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, आरोपींनी त्याला खोलीतून बाहेर पडण्याची संधी दिली नाही. जीवघेण्या प्रहारांमुळे राजेशने रक्ताच्या थारोळ्यात तडफडत जीव सोडला.
राजेशच्या मृत्यूचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्याला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून बाहेर फेकले. अशा पद्धतीने राजेशने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. इमारतीच्या खाली रक्त पडले होते तेही आरोपींनी पुसून काढले. सकाळी सहा वाजता साईश्रध्दा इमारतीच्या खाली एक इसम जखमी अवस्थेत पडल्याचे रहिवाशांना आढळून आले. तात्काळ ही माहिती पोलिसांना देण्यात आली.
डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवून दिला. त्यानंतर तात्काळ तपास चक्रांना वेग देऊन अवघ्या काही तासातच दोन्ही आरोपींना अटक केली.