मुंबई: पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेस गती देण्याचे सामर्थ्य भारतात आहे. असं केंद्रीय मंत्री सांगत आहेत. जगाचे राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या, असं सांगतानाच फक्त ‘आत्मनिर्भर’ होण्याचा ढोल वाजवून आर्थिक महासंकटाचा प्रश्न सुटणार नाही, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

देशात जे भूकमरी व बेरोजगारीचे संकट तसेच आर्थिक मंदीचा राक्षस धुमाकूळ घालतो आहे त्याच्याशी मुकाबला कसा करणार? हे संकट आजही घरात निपचीत पडून आहे. ते उपाशी पोटाची आग घेऊन घराबाहेर पडेल तेव्हा या स्वदेशी संकटाचा सामना करण्यासाठी सैन्य बोलवावे लागेल अशी चिंता आम्हाला सतावत आहे. कोट्यवधी चुली विझताना दिसत आहेत, त्याच वेळी घराघरात भुकेचा आगडोंब उसळताना दिसत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेस गती देण्याचे सामर्थ्य भारतात असल्याचे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवताना व्यक्त केले. जगाचे राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या. स्वातंत्र्य दिन येतो व जातो, लाल किल्ला तोच आहे, प्रश्न आणि दुःख तेच आहे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.

शिवसेनेची टीका

>> पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून लाल किल्ल्यावरून जे भाषण केले ते त्याच पद्धतीचे होते. पाकिस्तान किंवा चीनला त्यांचे नाव न घेता इशारे वगैरे देण्याचे सोपस्कार त्यांनी पार पाडले. ते नित्याचेच क्रियाकर्म आहे. चीन अद्यापि आपल्या भूमीत घुसलेलाच आहे. पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे. जम्मू-कश्मिरात जवानांची बलिदाने आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत.

>> पंतप्रधानांचे भाषण सर्वसमावेशक होते. करोनामुळे समोर गर्दी कमी होती. त्यामुळे प्रमुख मंडळींच्या चेहऱ्यावरचे भाव ‘मास्क’मुळे समजणे कठीण होते; पण पंतप्रधानांचा आवेश, जोश कमी झाला नव्हता.

>> देशात करोनाचा कहर झाला आहे. गेल्या २४ तासांत ६३ हजार ४८९ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर हजाराच्या आसपास लोक काल दिवसभरात मरण पावले. एका दिवसातला हा आक्रोश आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या पंचवीस लाखांवर पोहोचली व आतापर्यंत पन्नास हजारांवर लोक या महामारीत मरण पावले. हे चित्र धक्कादायक आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी ‘लस’ येत आहे, असे लाल किल्ल्यावरून सांगणे आशादायक आहे.

>> प्रत्येक नागरिकाला डिजिटल हेल्थ कार्ड दिले जाईल, नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची स्थापना होईल, असे पंतप्रधानांनी जाहीर केले. या आरोग्य ओळखपत्रात डॉक्टरांच्या भेटीपासून ते औषधोपचारांपर्यंत सर्व काही असेल. हे सर्व डिजिटल प्रकरण छानच असावे; पण आजच्या करोना महामारीने देशासमोर जे आर्थिक महासंकट उभे राहिले आहे त्याचे काय? फक्त आत्मनिर्भर होण्याचा ढोल वाजवून हा प्रश्न तत्काळ सुटेल असे वाटत नाही. आतापर्यंत देशात १४ कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. भविष्यात हा आकडा वाढेल. लोकांना घराबाहेर पडायचे आहे; पण घराबाहेर पडून काय करायचे? नोकरीधंदा, रोजगार गेला आहे. त्यांच्या भविष्यावर पंतप्रधानांनी भाष्य केले असते तर बरे झाले असते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here