सांगली : ॲक्सिलेटर फेल झाल्याने जिल्ह्यातील एका एसटी चालकाने आपल्या हाती स्टेअरिंग ठेवत ॲक्सिलेटरला दोरी बांधून ती महिला कंडक्टरच्या हाती दिली. तारेवरच्या कसरती प्रमाणे चालक आणि महिला वाहकाला सुमारे ४० किलोमीटरचा प्रवास करावा लागला. कवठेमहांकाळ आगाराची बस घाटनांद्रे या मार्गावर धावत असताना हा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात येतंय.

ॲक्सिलेटर खराब झालेल्या बसमुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून नाईलाजास्तव वाहकाने हा जुगाड केल्याचं समोर आलंय. नादुरुस्त ॲक्सिलेटर दोरीनं बांधून चालकाने शेवटी ती दोरी महिला वाहकाच्या हाती दिली आणि महिला वाहकाने ती अॅक्सिलेटरची दोरी योग्यवेळी कमी-जास्त ओढली. अशा पध्दतीने जुगाड करत जवळपास ४० किलोमीटर अंतर पार करण्यात आले. मात्र यामध्ये दुर्दैवाने घटना घडली असती तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

आई वडिलांच्या कष्टाचं पांग फेडलं, कामगाराचा मुलगा कामगार आयुक्त बनला!
नेमकी घटना काय?

गुरुवारी सायंकाळी पावणेसहा वाजता कवठेमहांकाळ-घाटनांद्रे बसमधील ऑक्सिलेटर कुची-जाखापूरदरम्यान अचानक निसटला. त्याक्षणी बसच्या बसलेल्या प्रवाशांचे हृदयाचे ठोके वाढले. पण प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बसचालकाने जुगाड केला. नादुरुस्त ॲक्सिलेटर दोरीने बांधून ती दोरी महिला वाहकाच्या हाती सोपवली. त्यांना ती ॲक्सिलेटरची दोरी योग्यवेळी कमी-जास्त ओढण्यास सांगितली. त्यांच्या मदतीने बसने ४० किलोमीटर अंतर पार करत बस सुरक्षित नेऊन प्रवाशांना धक्का दिला.

प्रवाशांकडून वाहक-चालकाचे कौतुक पण चुकून काही दुर्घटना घडली असती तर जबाबदार कोण होतं?

सायंकाळच्या वेळेला प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून वाहक आणि चालकाने जुगाड करुन प्रवाशांना इच्छित स्थळी सुखरुप पोहोचवलं खरं… बसमधून उतरताना सर्व प्रवाशांनी चालक वाहकांना धन्यवादही दिले. पण दुर्दैवाने अपघात घडला असता तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? असा प्रश्न आता विचारला जातोय.

पाटील आडनावाचा वाद : सुषमा अंधारे यांची गौतमीसाठी रोखठोक पोस्ट, फुल्ल सपोर्ट!
एसटीची दुर्दशा वारंवार समोर

‘वाट पाहिन पण एसटीनेच जाईल’, अशी उद्घोषणा १०-१५ वर्षांपूर्वी एसटीवर लिहिलेली असायची. पण सध्या तावदाने नसलेल्या खिडक्या, एसटीमधील फाटलेली आसने, खिळखिळ्या झालेल्या बसेस असं चित्र सगळ्याच आगाराच्या बसेसबाबतीत पाहायला मिळतं. मागील तीन महिन्यांपूर्वी भूम आगाराच्या खिळखिळ्या झालेल्या बसेसवर राज्य सरकारची जाहिरात झळकल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो फोटो एवढा व्हायरल झाला की त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संबंधित बसच्या झालेल्या दुर्दशेचे फोटो विधानसभेत दाखवून सरकारची सालटी काढली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here