म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गिरणी कामगारांना म्हाडामार्फत घरे उपलब्ध होण्याचा मार्ग पूर्णपणे सुकर झालेला नाही. सर्वच गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी संघटना आग्रही आहेत. त्यासाठी आंदोलनेही करण्यात आली आहेत. अशावेळी सर्वच गिरणी कामगारांना घरे मिळतील, अशी ग्वाही गिरणी कामगार संनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांनी दिली.म्हाडा प्राधिकरणाकडे एका लाख ७४ हजार गिरणी कामगारांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १५ हजार ८७० कामगारांच्या घरांची सोडत काढण्यात आली आहे. त्यातील आतापर्यंत नऊ हजार ६३१ गिरणी कामगारांना घरे मिळाली आहेत. उर्वरित एक लाख ५८ हजार कामगारांना घरे मिळण्याविषयी ही बैठक झाली. त्यात कामगारांची पात्रतानिश्चिती, पात्र लाभार्थ्यांना घरांचा ताबा, नवीन घरांची बांधणे आदी मुद्दे चर्चिले गेले. त्यासह, ‘एमएमआरडीए’कडील दोन हजार ५२१ घरांची सोडत काढण्याविषयी चर्चा झाली. पनवेलमधील कोणसाठी २०१७च्या सोडतीमधील ४०८ घरांची ताबा देण्याची प्रकिया पूर्ण झाली असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले.

उर्वरित कामगारांची १५ जूनपर्यंत पात्रतानिश्चिती केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याचप्रमाणेच सुमारे सात हजार कामगारांना घरे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. श्रीनिवास आणि बॉम्बे डाइंग मिलच्या तीन हजार ८९४ घरांचा ताबा लवकरच देण्यात येईल. ठाण्यातील राचयूरमधील दोन हजार २६३ घरे आणि कोल्हे पनवेलमधील २५८ घरे अशी मिळून दोन हजार ५२१ घरांची सोडत लवकरच काढण्यात याव्यात, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.

म्हाडाकडून अत्यल्प उत्पन्न गटाला मुंबईत घरखरेदीसाठी सर्वात मोठी संधी; नव्या लॉटरीत तब्बल इतकी घरे
‘दलालांविरोधात कठोर कारवाई’

गिरणी कामगारांच्या सोडतीत दलालांचा हस्तक्षेपाचा वारंवार आरोप केला जातो. त्यावर, म्हाडा कार्यालयातील गिरणी कामगार विभागात दलाल आढळल्यास त्याची माहिती द्यावी. ही माहिती देणाऱ्यास पाच हजार रुपये बक्षीस दिले जाईल व दलालांना पोलिसांच्या हवाली केली जाईल, असे राणे यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here