मुलीच्या कुटुंबियांनी संपूर्ण घटनाक्रमाबद्दल संशय व्यक्त केला. मुलीच्या अंगावर असलेल्या जखमा पाहता शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलेल्या घटनाक्रमाबद्दल त्यांना शंका होती. त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही तपासले. यातील एका सीसीटीव्हीत मुलगी शाळेच्या छतावरुन कोसळताना दिसली. त्यामुळे शाळा प्रशासनानं मुलीबद्दल चुकीची माहिती दिल्याचं उघड झालं.
शाळेला सुट्टी असतानाही मुख्याध्यापकांनी माझ्या मुलीला फोन करुन शाळेत बोलावलं. शाळेचे व्यवस्थापक ब्रिजेश यादव आणि क्रीडा शिक्षक अभिषेक कनौजिया यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आपला गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी तिला शाळेच्या गच्चीवरुन खाली फेकलं, अशा आशयाची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे नोंदवली आहे. यानंतर यादव आणि कनौजिया यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ ड, ३०२, २०१, १२० बच्या अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
शाळा प्रकरणानं संपूर्ण प्रकरणात दिशाभूल केल्याचं प्राथमिक तपासातून स्पष्ट झालं आहे. विद्यार्थिनी जिथून खाली पडली, त्या भागातील रक्ताचे डाग पुसण्यात आल्याचंही पोलीस तपासातून उघड झालं आहे. ‘या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, व्यवस्थापक आणि क्रीडा शिक्षक यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा तपास सुरू आहे,’ अशी माहिती अयोध्येचे पोलीस अधीक्षक मधुबन सिंह यांनी पीटीआयला दिली.