मुंबई : महापालिकेने मुंबईच्या नाल्यातून गाळ काढण्याचे निश्चित उद्दिष्ट एक आठवडाआधीच पूर्ण केल्याचे जाहीर केल्यानंतर आम आदमी पक्षातर्फे (आप) शनिवारी मुंबईतील विविध ठिकाणांचे पावसाळापूर्व स्थितीची जाणीव करून देणारी सुमारे ५०० छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. नद्या, उपनद्या, पर्जन्यजल वाहिन्या, त्यावरील झाकणे, टेकड्यांवरील झोपडपट्टीची ठिकाणे आदींचा यात समावेश होता. ही छायाचित्र पाहिल्यावर मुंबई पावसाळ्यासाठी खरोखरच सज्ज आहे का, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे प्रतिपादन ‘आप’तर्फे करण्यात आले.‘कुलाब्यापासून दहिसर, मुलुंडपर्यंत ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी जिओ टॅगिंग करून हे फोटो काढले आहेत. या टॅगिंगमुळे कोणत्या दिवशी नाल्याची, उपनद्यांची किंवा पर्जन्यजल वाहिन्यांची स्थिती काय होती, कुठल्या भागात ही स्थिती निर्माण झाली आहे, याची माहिती महापालिकेसह मुंबईकरांच्याही समोर येईल’, असे पक्षाचे मुंबईचे उपाध्यक्ष गोपाळ झवेरी यांनी सांगितले. रिव्हरमार्चच्या माध्यमातून मुंबईच्या नद्यांमधील कचऱ्याचा प्रश्न सातत्याने मांडण्यात येत असल्याने या नद्या, उपनद्यांची स्थिती काय होती याची जाणीव असल्याने हे वास्तव नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे ते म्हणाले.

नद्या, उपनद्यांमधून गाळ काढल्याचा दावा केला जात असला तरी साचलेला गाळाचे प्रमाण पाहता, या दाव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे झवेरी म्हणाले. मालवणी, कुर्ला, भांडुप, मानखुर्द, चेंबूर, जोगेश्वरी या भागांमध्ये परिस्थिती सर्वांत वाईट आहे. केवळ झोपडपट्टीच्या जवळपासचा भागच नाही, तर कुलाबा, अंधेरी पश्चिम अशा श्रीमंत लोकवस्तीतही हीच स्थिती आहे. अनेक ठिकाणी गाळ कडेला काढून ठेवण्यात आला आहे, तो गाड्यांमुळे रस्त्यावर पसरत आहे. काही ठिकाणी गाळाच्या नावाखाली नदीतील दगड, मुरुमही काढण्यात आले आहेत. गाळाचे वजन जास्त भरावे यासाठी त्यामध्ये दगडांचा समावेश केला जातो आणि ज्याचे पैसे मिळत नाहीत असा प्लास्टिक, कापडासारखा कचरा काढला जात नाही, असा आक्षेप त्यांनी नोंदवला.

मुंबईतील सोसायट्या, घरमालकांना पालिकेचा दणका; उपाययोजना न करणाऱ्यांवर थेट गुन्हे, कारण…
पर्जन्यजल वाहिन्यांवर काही ठिकाणे झाकणेही नाहीत, रस्त्यांवरील गटारांवरही झाकणे नाहीत, असे ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे पावसाळ्यात अपघातांची शक्यता वाढते. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वायरीही लटकताना आढळून आल्या आहेत. उतारावरील घरांना नोटिसा दिल्या गेल्या आहेत, मात्र त्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही, असे मुंबईच्या १५ दिवसांच्या अभ्यासामध्ये आढळून आल्याचे सांगण्यात आले. महापालिकेने या छायाचित्रांच्या आधारे पाऊस सुरू होण्यापूर्वी परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here