मुंबई इंडियन्सची यंदाच्या आयपीएलमध्ये सुरुवात फार चांगली झाली नव्हती. मात्र, अखेरच्या काही मॅचेस सलग जिंकत मुंबईनं क्वालिफायरमध्ये प्रवेश केला होता. मात्र, जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर या सारख्या गोलंदाजांची कमी मुंबईला जाणवत होती. अखेरच्या सामन्यात देखील या गोलंदाजांची कमी मुंबईला जाणवली.
मुंबई आता २०२३ च्या पर्वातील आव्हान संपल्यानंतर काही खेळाडूंना संघातून मुक्त करण्याची शक्यता आहे. मुंबई पुढील हंगांमाची तयारी म्हणून काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवत नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकते.
डेवाल्ड ब्रेविस या खेळाडूला मुंबईनं २०२२ च्या हंगामात संधी दिली होती. मात्र, २०२३ मध्ये त्याला मुंबईकडून एकाही सामन्यात संधी देण्यात आली नाही. मुंबईनं कॅमरुन ग्रीन आणि टीम डेव्हिडला संधी दिली होती. त्यामुळं डेवाल्ड ब्रेविसला बाहेर बसावं लागलं. आगामी हंगामापूर्वी त्याला मुंबईच्या टीमकडून मुक्त केलं जाऊ शकतं.
जोफ्रा आर्चरला मुंबईनं २०२२ मध्ये संधी दिली होती. मात्र, तो त्या हंगामामध्ये उपलब्ध नव्हता. मुंबईनं टीमची भविष्यातील गुंतवणूक म्हणून जोफ्रा आर्चरकडे पाहिलं होतं. जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत जोफ्रा आर्चर मुंबईच्या गोलंदाजीचं नेतृत्व करेल असं वाटलं होतं. मात्र जखमी झाल्यानं तो संघाबाहेर गेला. मुंबईला त्याचा देखील काही लाभ झाला नाही. त्यामुळं मुंबई जोफ्रा आर्चर बद्दल गांभीर्यानं विचार करु शकते.
जोफ्रा आर्चरची रिप्लेसमेंट म्हणून मुंबईनं ख्रिस जॉर्डनला संधी दिली. मात्र, यंदाच्या आयीपएलमध्ये जोफ्रानं ६ सामने खेळले त्यात त्याला केवळ ३ विकेट घेता आल्या. त्यानं धावा देखील जादा दिल्या. त्यामुळं मुंबई पुढील हंगामापूर्वी ख्रिस जॉर्डनला देखील मुक्त करण्याची शक्यता आहे.