उल्हासनगर : उल्हासनगरमधील राजकीयदृष्ट्या बलाढ्य असलेले कलानी कुटुंब मध्यंतरी अडीच ते तीन वर्षांच्या काळासाठी भाजपसोबत गेले होते. मात्र भाजपचा दबाव असल्यानं आपण राष्ट्रवादी सोडताना शरद पवार यांची परवानगी घेऊनच गेलो होतो, असा खुलासा आता पप्पू कलानी यांची सून आणि माजी महापौर पंचम कलानी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने शहरात चर्चांना उधाण आलं आहे.उल्हासनगरमधील एकेकाळचा डॉन आणि माजी आमदार पप्पू कलानी सुरुवातीपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. पप्पू कलानी यांना एका हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर मध्यंतरीच्या काळात पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी याने भाजपसोबत जवळीक साधली होती. टीम ओमी कलानी नावाने संघटना स्थापन करत त्याचे सर्व उमेदवार भाजपच्या चिन्हावर कलानी यांनी उभे केले होते. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार येताच पप्पू कलानी यांची जेलमधून सुटका झाली आणि भाजपपासून फारकत घेऊन पुन्हा एकदा कलानी परिवार राष्ट्रवादीत आला. यानंतर नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पप्पू कलानी यांची सून माजी महापौर पंचम ओमी कलानी यांनी एक वक्तव्य केलं, आपण भाजपात जाताना शरद पवार साहेबांची परवानगी घेऊनच गेलो होतो, असा खुलासा पंचम कलानी यांनी केला.

वडिलांचं निधन, काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांचीही प्रकृती बिघडली; एअर ॲम्ब्युलन्सने दिल्लीला

दरम्यान, पंचम ओमी कलानी यांच्या या वक्तव्यामुळे उल्हासनगर शहरात चर्चांना मोठं उधाण आलं आहे. याबाबत त्यांना विचारलं असता, तेव्हाची परिस्थितीच तशी होती की आपण शरद पवार साहेबांच्या परवानगीने भाजपात गेलो होतो. कारण त्यावेळी काही मोठ्या कौटुंबिक अडचणी होत्या, असं पंचम कलानी म्हणाल्या. भाजपने कलानी परिवाराला घेताना पप्पू कलानी यांना जेलमधून बाहेर काढण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते आश्वासन भाजपने पाळलं नाही, म्हणूनच कलानी परिवार पुन्हा एकदा राष्ट्रवादीत आला अशीही चर्चा यानंतर उल्हासनगरमध्ये सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here