स्वराने केलेल्या ट्वीटवर नेहमीप्रमाणे संमिश्र प्रतिक्रिया उमटल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थकांनी स्वराला सुनावले, तर या कुस्तीपटूंच्या बाजुने उभे असणाऱ्यांनी स्वराला पाठिंबा दिला आहे. स्वराचे हे ट्वीट चांगलेच व्हायरल झाले आहे.
जंतरमंतरवर नेमकं काय घडलं?
रविवारी मोठ्या थाटामाटात संसदभवनाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाले. तिथून काहीच अंतरावर असणाऱ्या जंतरमंतर मैदानावरुन मात्र देशाची शान वाढवणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतले. विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह आंदोलक कुस्तीपटूंना रविवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. हे कुस्तीपटू नवीन संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न करताना सुरक्षेचा भंग झाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. ज्याठिकाणी एकदिवसीय महापंचायत आयोजित करण्यात आली होती त्याठिकाणी पोहोचण्याचा या कुस्तीपटूंचा प्रयत्न होता. याठिकाणी पोलीस आणि कुस्तीपटू यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली.
भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटूंचे हे आंदोलन जंतरमंतरवर २३ एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्यात आले. त्यांच्या अटकेची मागणी या कुस्तीपटूंकडून केली जातेय. बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केलेत. त्यामुळे त्यांना पदावरुन हटवण्याची मागणी गेल्या काही काळापासून जोर धरते आहेत. मात्र जंतरमंतरवर आज पोलिसांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. अभिनेत्री स्वरा भास्करनेही या घटनेदरम्यानचाच फोटो पोस्ट केला आहे. दरम्यान भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पदकं जिंकणाऱ्या या कुस्तीपटूंची मागणी ऐकून घेण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे.