इराण लष्कराचा मेजर कासीम हा दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत होता. अनेक दहशतवाद्यांचा त्यांना पाठिंबा होता. मध्य पूर्वेतील आशियात दहशतवाद पोहोचवण्यात तो अग्रेसर होता. अमेरिकेच्या तळावर हल्ला करण्याची त्याची योजना होती. अमेरिकन नागरिकांच्या जीवाला धोका असल्यामुळे सुलेमानीवर कारवाई करण्यात आली आणि त्याला कंठस्नान घालण्यात आले, असे ट्रम्प यांनी सांगितले.
इराणने केलेल्या हल्ल्यात कोणताही अमेरिकन सैनिक मारला गेला नाही, असा दावा करत अमेरिकेच्या तळाचे मात्र थोडे नुकसान झाले आहे. अमेरिकेने घेतलेल्या खबरदारीमुळे कुणालाही या हल्ल्याचा फटका बसला नाही. अमेरिकेच्या पुरुष आणि महिलांनी यामध्ये मोठे धाडस दाखवले, असे ट्रम्प म्हणाले.
अमेरिका कोणाला घाबरत नाही. अमेरिकी सैन्य जगातील सर्वोत्तम सैन्य आहे. कोणत्याही हल्ल्याचे प्रत्युत्तर जसेच्या तसे देण्याची क्षमता अमेरिकेच्या सैन्यात आहे. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी अमेरिका सुसज्ज आहे, सक्षम आहे. मात्र, आम्हांला शांतता हवी आहे, असे सांगत इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही. इराणवर आर्थिक निर्बंध लादले जातील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.
इराण आणि अमेरिकेत अण्वस्त्रांसंदर्भात करार झाला होता. मात्र, इराण अमेरिकेच्या जीवावर उठला, असे सांगत इराणच्या या कृत्यामुळे मध्य पूर्वेकडील देशांमध्ये शांतता नांदणार नाही. चीन, रशिया, फ्रान्स आणि इंग्लंड या देशांनी इराणविरोधात अमेरिकेला साथ द्यावी, असे आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी केले.
दरम्यान, अमेरिकेला पाहून आम्ही माघार घेणारे नाही, हे अमेरिकन लष्करी तळांवर आम्ही केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांवरून स्पष्ट झाले आहे, असे इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी सुनावले. अमेरिकेने गुन्हा केल्यास जशास तसे उत्तर मिळेल, हे या देशाने ध्यानात ठेवावे. अमेरिका हा इशारा समजण्याइतकी हुशार असेल तर यावेळी ती उलट कारवाई करणार नाही, असेही त्यांनी बोलून दाखवले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times