म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील २२ आमदार त्रस्त असून, ते बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत. याशिवाय १३ खासदारांपैकी नऊ खासदार वैतागले असून, आमच्या संपर्कात आहेत. कामे होत नाहीत. तुच्छतेची वागणूक मिळत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. एकनाथ शिंदे स्वत: स्थिरस्थावर झाले, पण इतर कुणालाही किंमत मिळत नसल्याची तक्रार या आमदार आणि खासदारांची आहे,’ असा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी रविवारी केला.’शंभूराज देसाई यांनी १५ दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना निरोप पाठवला होता. आमची इकडे गळचेपी होत आहे, असे देसाई यांनी ठाकरे यांना सांगितले,’ असा दावा राऊत यांनी केला. ‘तानाजी सावंत आणि गजानन कीर्तीकर यांनीही असंतोषाला वाट मोकळी करून दिली आहे. सावंत यांना अर्थसंकल्पातून पुरेसा निधी मिळत नसल्याने आगीतून निघून फुफाट्यात पडल्याचे ते म्हणत आहेत. शिंदे यांच्या बाजूला गेलेल्या आमदार आणि खासदारांची कोंडी झाली आहे,’ असा दावा राऊत यांनी केला.
दरम्यान, ‘नव्या संसदेची इमारत भव्यदिव्यच आहे. विक्रमी काळात ही इमारत उभी केली, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकच आहे. पण कार्यक्रमाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती असते तर काय झाले असते? ही लोकशाहीची अवहेलना आहे,’ असे ते म्हणाले.