जालना: सैन्य भरतीसाठी सराव करणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाचा जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील शिराळा येथील पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल शनिवारी सकाळी घडली आहे. किरण सुरेश साळवे असे मयताचे नाव आहे. सैन्य दलात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून नियमित सराव करणाऱ्या किरणचा तलावात पोहत असताना अचानक बुडून मृत्यू झाल्याची घटना अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे. जाफराबाद व देऊळगाव राजा यांची हद्द एकच असल्याने दोन्ही तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

शेजारील विदर्भातील किनगाव राजा ता. सिंदखेडराजा येथील तरुण किरण साळवे हा सैन्य दलात जाण्यासाठी शारीरिक सराव करायचा. त्यासाठी तो देऊळगावराजा येथे राहत होता.दररोज पहाटे तो नित्यनेमाने देऊळगावराजा ते लगतच असलेल्या जाफराबाद तालुक्यातील शिराळा तलावापर्यंत धावण्याचा सराव करायचा. धावल्यानंतर तो दररोज शिराळा तलावात मित्रांसोबत काहीवेळ पोहायचा सुध्दा.पण काल नियतीने त्याच्यावर घाला घातला. काल शनिवारी सकाळी मित्र सोबत नसल्याने तो एकटाच पोहण्यासाठी तलावात उतरला. मात्र तलावातील खोल खड्डयाचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडाला.खूप वेळ झाला तरी तो घरी न परतल्याने त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला असता तो तलावात बुडाल्याचे त्यांना कळाले.

पत्नीला कळलं, आरडाओरड करत धावली, पण उशीर झाला होता, शाळेच्या हौदात घडलं विपरीत

एक तरुण तलावात बुडाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली व नागरिकांची गर्दी जमा झाली.कुणी तरी टेंभुर्णी पोलिसांना ही बाब कलवताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.ग्रामस्थ व पोलिसांनी मिळून सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेतला, परंतु त्यांना यश आले नाही. अखेर रविवारी सकाळी किरणाचा मृतदेह बाहेर काढण्यात ग्रामस्थ व पोलिसांना यश आले. टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर रविवारी दुपारी मयत किरण याच्यावर किनगावराजा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. टेंभूर्णी पोलीस ठाण्याचे सपोनि.रवींद्र ठाकरे, PSI सतीश दिंडे,बीट जमादार दिनकर चंदनशिवे, हरी क्षीरसागर, अशोक घोंगे, गजेंद्र भुतेकर आदींनी घटनास्थळी थांबून मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

पोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुडून मृत्यू

किरणला सैन्य दलात जायचे होते,त्यासाठी तो नियमित सराव करायचा. नुकताच तो लेखी परीक्षेत उत्तीर्णही झाला होता. त्यामुळे त्याने आता सर्व लक्ष फिजिकल सरावावर केंद्रित केले होते. व्यायामानंतर तो दररोज पोहण्याचा सराव करायचा, पण हा पाण्यातील सरावच एक दिवस आपल्या जिवावर उठेल याचा पुसटसा विचारही त्याने केला नसेल. त्याच्या जाण्याने त्याच्या कुटुंबासह गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here