याबाबत माहिती अशी की, शनिवारी रात्री १० वाजता कोल्हापूर येथील दागिन्यांच्या कुरिअरचे पार्सल घेऊन ते पुण्याच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांच्यासोबत गोलू दिनेश परमार (रा. बसेरी, राजस्थान) हे होते. संतकुमारसिंग यांची बोलेरो बोरगाव हद्दीत आली असता पाठीमागून आलेल्या इनोव्हा कारने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतकुमारसिंग हे न थांबल्याने इनोव्हा चालकाने गाडी आडवी मारली. यावेळी इनोव्हातील चार संशयितांनी संतकुमारसिंग व गोलू यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून ते बोलेरो गाडी ताब्यात घेत सातारच्या दिशेन निघून गेले. याचदरम्यान पाठीमागून दोन दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी काही काळ दोघांनाही पकडून ठेवले. यानंतर दोघांना ढकलून त्यांनीही पोबारा केला. घटनेनंतर संतकुमार सिंग यांनी स्थानिकाच्या मोबाईलवरून ही माहिती कंपनीचे मॅनेजर राजकिशोर परमार यांना दिली. कुरिअरचे पार्सल नेणाऱ्या बोलेरो चालक संतकुमारसिंग उरणसिंग परमार (सध्या रा. शिवाजी चौक, कोल्हापूर) यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
संतकुमारसिंग हे साईनाथ एक्सप्रेस कुरिअरसाठी मुंबई शाखेत काम करतात. मात्र, कोल्हापूर शाखेचा कर्मचारी आजारी असल्याने गेल्या पाच दिवसांपासून ते बोलेरो (एमएच ४३ बीपी ८४२७) या गाडीवर सोन्या-चांदीचे दागिन्यांच्या कुरिअरचे बॉक्स पोहचवण्याचे काम करत आहेत. या घटनेचा तपास सपोनि रवींद्र तेलतुंबडे व पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर करत असतानाच यवत पोलिसांनी संशयितांना रविवारी पहाटे जेरबंद केले.
यवत पोलिस व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या टोळीला कासुर्डी नाक्यावर पकडले. त्यांच्याकडून १७ किलो चांदी आणि ११ तोळे सोने जप्त केले. तर आणखी ४ किलो सोन्यापेक्षा जादा ऐवज घेऊन दोन चोरटे पळून गेले. चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पसार झालेल्या दोन चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस दलाने श्वान पथकाला पाचारण केले आहे.