दुर्गेशने रविवारी दुपारी अडीचला त्याच्या मोबाईलमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हॉटसअॅपवर एक स्टेटस ठेवलं होतं. स्टेटसमध्ये त्याने तो आत्महत्या करत असल्याचं त्याने लिहिलं होतं. त्याने स्टेटसमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला. माझ्या आईवर आणि भावावर कर्ज झालं आहे, कर्ज देणारे खूप त्रास देत आहेत. त्यामुळे त्यांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे, अशा आशयाचा मजकूर लिहून ते स्टेटस ठेवलं होतं.
दुर्गेशने असं स्टेटस ठेवल्यानंतर त्यांच्या अनेक मित्रांनी ते पाहिलं आणि त्याच्या मित्रांमध्ये एकच खळबळ उडाली. दुर्गेशचा शोध घेण्यासाठी मित्र रवाना झाले. त्याची शोधाशोध सुरू झाली. मात्र रविवारी दुपारी जवळपास तीन वाजता सावळदे (ता. शिरपूर) येथील पुलावरून तापी नदीपात्रात उडी टाकताना त्याला काहींनी पाहिलं. त्यानंतर लगेचच त्याचा शोध सुरू झाला. तापी नदीतून सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह बाहेर काढला.
दुर्गेश धनगर याच्या वडिलांचं निधन झालं असून त्याच्या मागे आई, मोठा भाऊ आणि बहीण असं कुटुंब आहे. त्याच्या मोठ्या भावाने काही जणांकडून कर्ज घेतलं होतं. प्रचंड व्याजदर लावल्यामुळे कर्जाची रक्कम वाढत गेली. संशयित सावकार दुर्गेशच्या भावाला मारहाण करून वसुली करू लागले. त्यामुळे दुर्गेशच्या भावाने सावकाराच्या जाचाला कंटाळून काही दिवसांपूर्वी शिरपूर शहर सोडलं आणि तो बाहेर गावी निघून गेला होता.
नंतर सावकाराने आपला मोर्चा दुर्गेशकडे वळवला. त्यालाही धमकावणं सुरू झालं. त्यांच्या त्रासाला वैतागून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. दुर्गेशला कोण कोण त्रास देत होतं, धमकावत होतं याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.