सोलापूर : कर्नाटकातील होस्पेटजवळील दोट्टीहाळ या गावाजवळ ट्रकने कारला जोरदार धडक देत कारला चिरडले. या अपघातात सहा जण ठार झाले आहेत. त्यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील चार जण तर कर्नाटक राज्यातील दोघांचा समावेश आहे. बेंगळुरूकडे आपल्या कारमधून निघालेले दोघे पती-पत्नी, त्यांची दोन मुले अशा चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच इंडी तालुक्यातील नंद्राळ गावच्या त्यांच्या दोन नातेवाईकांचाही यात मृत्यू झाला आहे.रविवारी सायंकाळी घडलेल्या या अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावात शोककळा पसरली आहे. लवंगी गावच्या अख्या कुटुंबाला ट्रकने चिरडले आहे. राघवेंद्र सुभाष कांबळे (वय वर्षे २५), जानू राघवेंद्र कांबळे (वय वर्षे २३), राकेश राघवेंद्र कांबळे (वय वर्षे ५) व रश्मिका राघवेंद्र कांबळे (वय वर्षे २) सर्वजण राहणार लवंगी (ता.दक्षिण सोलापूर) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. राघवेंद्र कांबळे हे सोलापूरच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावचे रहिवासी होते. बेंगळुरू येथील खासगी कंपनीत नोकरीला होते. ते पत्नी आणि दोन मुलांसह बेंगळुरू येथे रहात होते. लवंगी येथे यल्लम्मा देवीची यात्रा होती. त्यानिमित्ताने कांबळे परिवार गावाकडे आले होते.

दोन नातेवाईकांचाही मृत्यू

राघवेंद्र कांबळे हे पत्नी आणि दोन मुलांसह बेंगळुरूकडे जात होते. यावेळी इंडी तालुक्यातील नंद्राळ गावच्या दोघा नातेवाईकांनाही सोबत घेतले होते. संतोष व खाजू अशी त्यांची नावे आहेत. राघवेंद्र कांबळे हे आपल्या खासगी कारने जात होते. कर्नाटकमधील होस्पेटजवळ असलेल्या दोट्टीहाळ येथे त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. अपघात इतका भीषण होता की कांबळे यांच्या कारमधील सर्वजण जागीच ठार झाले.

पंढरपूरसाठी देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, महाराष्ट्रातील सर्वांत मोठा आराखडा मंजूर
दरवर्षीप्रमाणे यलम्मा देवीच्या यात्रेला यायचे

राघवेंद्र कांबळे हे पंधरा दिवसांपूर्वी आपल्या मूळगावी लवंगी येथे आले होते. दरवर्षी यल्लमा देवीच्या यात्रेसाठी येत होते. रविवारी ते बेगळुरूला जाण्यासाठी आपल्या कारमधून दोन मुलं व पत्नीसह गेले. नंद्राळ इंडी येथील बहिणीच्या नातेवाईकांना घेऊन ते पुढील प्रवासासाठी निघाले. हॉस्पेटच्या पुढे गेल्यानंतर भरधाव ट्रकने त्यांच्या कारला समोरून जोराची धडक दिली. यामध्ये ट्रकच्या खाली कार अडकली. अपघात इतका भयंकर होता की कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. राघवेंद्र कांबळे हे एकुलते एक होते. वडील सुभाष आणि आई इंदुमती यांना या घटनेने धक्का बसला आहे. राघवेंद्र याना तीन विवाहित बहिणी आहेत. राघवेंद्रसह त्यांची पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने लवंगी गावावर शोककळा पसरली आहे.

चौघे मित्र पोहायला गेले, दोघेच परतले; घरी कुणालाच थांगपत्ता नाही; घातपाताचा संशय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here