२०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बाळू धानोरकर यांनी संजय देवताळे यांचा पराभव केला होता. संजय देवताळे यांनी मंत्री म्हणून काम केलेलं होतं. मंत्रिपदाचा अनुभव असणारे देवताळे त्यावेळी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत होते. बाळु धानोरकर यांनी ५३८७७ मतं मिळवली तर संजय देवताळे यांना ५१८७३ मतं मिळाली होती. संजय देवताळे यांचा पराभव करत बाळू धानोरकर यांनी विधानसभेत प्रवेश केला होता.
हंसराज अहीर यांचा पराभव करत लोकसभेत
बाळू धानोरकर यांनी २०१४ ला विधानसभेत शिवसेना आमदार म्हणून पहिल्यांदा प्रवेश केला. काही कारणांमुळं बाळू धानोरकर शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसनं २०१९ मध्ये त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. राज्यातील बडे काँग्रेस नेते लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले असताना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात नवख्या बाळू धानोरकर यांनी हंसराज अहीर यांना पराभूत केलं. हंसराज अहीर केंद्रात मंत्री म्हणून कार्यरत होते. हंसराज अहीर यांचा पराभव चर्चेत राहिला होता. बाळू धानोरकर यांना लोकसभा निवडणुकीत ५ लाख ५९ हजार ५०७ मतं मिळाली. तर, हंसराज अहीर यांना ५ लाख १४ हजार ७४४ मतं मिळाली होती.
चंद्रपूरचा जाएंट किलर नेता हरपला
बाळू धानोरकर यांनी वयाच्या ३९ व्या वर्षी चंद्रपूरमधील दिग्गज नेते मंत्री म्हणून काम केलेले नेते संजय देवताळे यांचा पराभव करत २०१४ ला विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर २०१९ ला हंसराज अहीर हे केंद्रात मंत्री म्हणून चंद्रपूरचं प्रतिनिधीत्व करत होते. त्यांना देखील बाळू धानोरकर यांनी पराभूत केलं. राजकीय लढाईत जाएंट किलर ठरलेल्या बाळू धानोरकर यांच्या निधनानं चंद्रपूरच्या जनेतला मोठा धक्का बसला आहे.