म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीमध्ये पालिकेने शाळांचे वर्ग चालविण्यासाठी भाड्याने घेतलेल्या खोल्या परस्पर विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बीडीडी चाळ क्रमांक १०० आणि ८४ मधील सहा वर्गखोल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सहा खासगी व्यक्तींना हस्तांतर केले. यासाठी खोटी प्रतिज्ञापत्रे, खोटे रेशनकार्ड, खोट्या सह्यांचा वापर करण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे तीन अधिकारी आणि ज्यांच्या नावावर वर्गखोल्या हस्तांतरण करण्यात आल्या असे सहा जण मिळून एकूण नऊ जणांवर वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शाळांचे वर्ग भरविण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये वर्गखोल्या अनेक वर्षांपासून भाड्याने घेतलेल्या आहेत. वरळी येथील बीडीडी चाळीच्या १५ इमारतींमध्ये ६६ खोल्या पालिकेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या मुंबई विकास विभागाकडून (चाळी) भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. यापैकी बीडीडी चाळ क्रमांक ८४ आणि क्रमांक १०० मधील वर्गखोल्यांमध्ये मराठी माध्यम आणि तेलगू माध्यमांचे वर्ग भरविण्यात येत होते. या दोन्ही चाळी धोकादायक असल्याने सहा वर्गखोल्यांमधील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका शाळेत पाठविण्यात आले.

विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आल्यानंतर पालिकेच्या वतीने या सहा वर्गखोल्या कुलूपबंद ठेवण्यात आल्या. मात्र, पालिकेच्या वतीने लावण्यात आलेली कुलुपे काढून त्याजागी काही खासगी व्यक्तींनी कुलपे लावल्याचे पालिकेच्या एफ दक्षिण विभागाच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ कुलपे बदलली आणि या प्रकाराची चौकशी सुरू केली.
मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुंबई विकास विभाग (चाळी) यांतील तीन अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांआधारे या सहा वर्गखोल्या सहा खासगी व्यक्तींच्या नावावर हस्तांतर केल्या. त्यातून स्वतःला आर्थिक मोबदला मिळवताना सरकारची फसवणूक केली. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून वरळी पोलीस ठाण्यात तीन अधिकारी आणि खोल्या खरेदी करणारे सहाजण अशा एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.