अमेरिकेच्या खजिन्यात २५ मे पर्यंत फक्त ३८.८ अब्ज डाॅलर रोकड शिल्लक होती. या महिन्याच्या सुरुवातीला हा आकडा २०० अब्ज डाॅलर होता, तर आता ही रक्कम ३० अब्ज डाॅलरच्या नीचांकी पातळीच्या जवळ आहे. ट्रेझरीद्वारे कर्ज घेण्याची मर्यादा वाढविण्यावर आतापर्यंत कोणतेही एकमत झालेले नाही.
अमेरिकेपेक्षाही जास्त पैसा
भारतातील अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची संपत्तीही अमेरिकेच्या रोख रकमेपेक्षा जास्त आहे. इतकेच नाही तर ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार जगातील ३१ अब्जाधीशांकडे अमेरिकेच्या कॅश रिझर्व्हपेक्षा जास्त संपत्ती आहे.
अंबानींकडे दुप्पट पैसे
ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, रिलायन्स समूहाचे मालक मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १३ व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ८६.१ अब्ज डॉलर असून ही मालमत्ता अमेरिकेच्या ३८.८ अब्ज डॉलरच्या रोख साठ्यापेक्षा दुप्पट आहे. त्याच वेळी गौतम अदानी ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत १८व्या स्थानावर असून त्यांची एकूण संपत्ती ६२.९ अब्ज डाॅलर आहे, जी अमेरिकेच्या रोख साठ्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.
बर्नार्ड अर्नॉल्टकडे ५ पट पैसा
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नॉल्ट यांची संपत्ती १९३ अब्ज डाॅलर आहे. हे अमेरिकेच्या रोख साठ्यापेक्षा सुमारे पाच पट अधिक आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत अर्नॉल्टनंतर एलन मस्क, जेफ बेझोस, बिल गेट्स इत्यादी अनेक अब्जाधीश आहेत. या सर्व अब्जाधीशांकडे अमेरिकेच्या रोख रकमेपेक्षा जास्त संपत्ती आहे.