बाळू धानोरकर यांचे आज सकाळी निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव नागपूरमध्ये कधी येणार, याची प्रतीक्षा कार्यकर्त्यांना होती. दुपारच्या सुमारास नागपूर विमानतळावर खासदार बाळू धानोरकर यांचे पार्थिव आणण्यात आले. यावेळी काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांनी धानोरकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा यांना शोक अनावर झाला. अश्रू थांबेनासे झाले. त्यांची स्थिती पाहून सुनील केदार यांनी पुढे होत त्यांना आधार दिला. शिवानी वडेट्टीवार यांनीही प्रतिभा धानोरकर यांना सांभाळून घेतले. यावेळी संपूर्ण धानोरकर कुटुंब सोबत होते. दीड वाजता धानोरकर यांचे पार्थिव वरोराकडे रवाना झाले. दुपारी चार वाजेपासून धानोरकर यांचे पार्थिव निवासस्थानी दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता धानोरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
बाळू धानोरकरांच्या चिंतेने सासरे झाले होते अस्वस्थ
खासदार बाळू धानोरकर राज्यातले काँग्रेसचे एकमेव खासदार होते. त्याच्या मला अभिमान होता. लोक मला विचारायचे तुमच्या जावई खासदार आहे. मी अभिमानाने सांगत होतो. कुठलाही कार्यक्रमात ते जेव्हा स्टेजवर असायचे. तेव्हा मला ते आवाज द्यायचे. विचारपूस करायचे. असा त्यांच्या स्वभाव होता. जावई खासदार आणि मुलगी आमदार ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. खासदार बाळू धानोरकरची प्रकृती चिंताजनक होती. हे मला नंतर कळलं. मी जेव्हा त्यांचा वडीलांच्या अंत्यसंस्कारसाठी गेलो, तेव्हा प्रतिभा माझ्याजवळ आली अन तिने सांगितल की त्यांची प्रकृती बरोबर नाही. त्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो. आपल्या जावयाबद्दल जुन्या आठवणीत रमलेले सासरे ओल्या डोळ्यांनी बाळू धानोरकर यांच्या आठवणी सांगत होते.