नंदुरबार जिल्हा प्रशासनानं ८ मार्चपासून जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन अक्षता सुरु केलं होतं. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षताचे नंदुरबार पोलीसांचे सर्वत्र कौतूक होत आहे. तसेच ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील बालविवाहाच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यात यश येईल, अशी माहिती पी.आर. पाटील यांनी दिली.
नंदुरबार जिल्ह्यातील ६३४ ग्रामपंचायतींपैकी ६३१ ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह विरोधी ठराव मंजूर करण्यात आले आहेत, तसेच उर्वरीत ०३ ग्रामपंचायतींचे ठराव देखील लवकरच घेण्यात येतील. त्याचप्रमाणे आज पावेतो नंदुरबार जिल्हा पोलिसांनी १९ बालविवाह रोखले आहेत.
“ऑपरेशन अक्षता” या उपक्रमांतर्गत पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलच्या सदस्य असलेले गाव पातळीवरील महत्वाचा घटक म्हणजे पोलीस पाटील यांची “ऑपरेशन अक्षता” हा उपक्रम सुरु झ आल्यापासून दर मंगळवारी बैठक घेण्यात येत असते. नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस पाटील यांच्या आतापर्यंत १२० बैठका घेण्यात आलेल्या आहेत. तसेच पुढील काळात पोलीस ठाणे येथे घेण्यात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारच्या बैठकीत स्तरावरील अक्षता सेलचे सदस्य असलेले ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व बीट अंमलदार यांच्या देखील बैठका घेण्यात येणार आहेत.
कोलदा गावातील रहिवासी नंदा गावित यांनी पोलिसांनी आम्हाला बालविवाहासंदर्भात नागरिकांकडून होणाऱ्या चुका सांगितल्या, आम्हाला त्याच्या परिणामाची जाणीव करुन दिली त्यामुळं आमच्या गावात बालविवाह होऊ देणार नाही, असं नंदा गावित म्हणाल्या.
बालविवाहाचा प्रश्न गंभीर
राज्यात बालविवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. करोना संसर्गाच्या काळापासून बालविवाहाची संख्या वाढलेली आहे. विविध जिल्ह्यातील जिल्हा बाल संरक्षण, पोलीस प्रशासन, गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणा आणि सरपंचांच्या सहाय्यानं बालविवाहाचे प्रयत्न रोखण्यात येत आहेत. नंदुरबारच्या जिल्हा परिषदेच्या एका अधिकाऱ्यानं नाव नं जाहीर करण्याच्या अटीवर ५ टक्के मुली १८ वय पूर्ण नसताना पहिल्या मुलाला जन्म देतात, अशी माहिती दिली. आदिवासी विभागाच्या २०१९-२० आणि २०२१-२२ दरम्यान १५ टक्के मुलींची लग्न १८ पेक्षा वय कमी असताना झाल्याचं म्हटलंय.