गुवाहाटी:
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आसाममध्ये तीव्र विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान यांनी येत्या १० जानेवारीला होणाऱ्या खेलो इंडिया गेम्सच्या उद्घाटनासाठी न जाण्याचा निर्णय़ घेतला आहे. पंतप्रधान मोदींच्या या अनुपस्थितीमागे वेळेचं कारण देण्यात येत आहे. मात्र कायद्याविरोधात निदर्शने करण्याच्या ऑल स्टुडंट्स युनियनच्या इशाऱ्यामुळे मोदींनी हा दौरा रद्द केल्याचं बोललं जात आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध होत असताना पंतप्रधान मोदी गुवाहाटीला येत असल्याचं वृत्त आलं होतं. नव्या कायद्याविरुद्ध आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या ऑल स्टुडंट्स युनियन (एएएसयू) ने मोदी आसाममध्ये आल्यास मोठं आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, पंतप्रधान मोदींकडे वेळ नसल्याने हा दौरा रद्द होत असल्याची माहिती भाजपचे प्रवक्ता दीवान ध्रुव यांनी दिली.

ध्रुव यांनी सांगितलं की राज्य सरकारने मोदींशी संपर्क केला, मात्र त्यांना या उद्घाटन कार्यक्रमासाठी वेळ काढता आला नाही. पक्षाचे अन्य प्रदेश प्रवक्ता रुपम गोस्वामी म्हणाले, ‘खेलो इंडिया युथ गेम्स’ च्या उद्घाटनासाठी मोदी यांनी यावं यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. पण गोस्वामी यांना विचारलं की मोदींनी हा दौरा रद्द केला आहे का, तेव्हा त्यांनी मोदी येणार अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं.

गोस्वामी म्हणाले, ‘पंतप्रधानांना निमंत्रण पाठवणं ही एक औपचारिकता आहे. आम्हाला पीएमओकडून निमंत्रणासंबंधी कोणतीही सूचना मिळालेली नाही.’ राज्याचे अर्थमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी पंतप्रधानांचा असा कोणता कार्यक्रम आहे, याचाच इन्कार केला आहे. ते म्हणाले, ‘जर असा कोणता दौरा ठरलाच नव्हता, तर तो रद्द कसा होईल.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here