काय आहे संपूर्ण प्रकरण?
२०१६ च्या अलिबाग सहलीच्या प्रकरणामध्ये विशेष सरकारी अधिकारी वकील वीणा शेला यांनी नागरी शाळेच्या प्रशिक्षकाने केलेल्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक खुलासा केला आहे. यामध्ये तपासलेल्या १० साक्षीदारांपैकी एका १४ वर्षीय मुलीने न्यायालयामध्ये शिक्षकाच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश केला. तिने सांगितलं की, घटनेच्या दोन महिन्यांआधी ५ विद्यार्थ्यांसह तिला शाळेच्या स्पोर्ट्स रूममध्ये बोलावण्यात आलं जिथे तिची ओळख आरोपी शिक्षकाशी झाली. तो लगोरीचं प्रशिक्षण देणार होता.
अधिक माहितीनुसार, आरोपी हा इतर खेळांचाही प्रशिक्षक होता. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे खेळाचे सराव सुरू असताना त्याने अनेक विद्यार्थीनींचा विनयभंग केला आहे. मुलीने कोर्टात सांगितलं की, त्यावेळी १५ विद्यार्थींनींना प्रशिक्षण दिलं जात होतं. जेव्हा सराव सुरू असायचा तेव्हा आरोपी शिक्षक हा एका-एका मुलीला स्पोर्ट्स रुममध्ये बोलवायचा आणि प्रत्येक मुलगी तिथे १० मिनिटं असायची. पण तिथे काय बोलावलं जायचं असं विचारलं असता यावर कोणीही उत्तर दिलं नाही.
यावेळी मुलीने पुढे सांगितलं की, २०१६ मध्ये तिच्या एका शाळेतील मैत्रिणीनेही तिला आरोपीने तिचा विनयभंग केल्याचं सांगितलं होतं. ती पुढे म्हणाली की, जुलै २०१६ मध्ये विद्यार्थ्यांना अलिबागमधील स्पर्धेबद्दल सांगण्यात आले आणि प्रत्येकी २,००० रुपये जमा करण्यास सांगितले. पण, पावसामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. यानंतर ३० जुलै २०१६ रोजी, इतर विद्यार्थी आणि ती शेवटी आरोपी शिक्षकासोबत बसने स्पर्धा खेळण्यासाठी गेले.
रांगेत उभं केलं आणि मुलींच्या छातीकडे टक लावून पाहत राहिला…
ती पुढे म्हणाली की, ‘सकाळी आम्ही रिसॉर्टमध्ये पोहोचलो. स्पर्धा संध्याकाळी असल्यामुळे आम्हाला खेळण्यासाठी आणि मज्जा करण्यासाठी वेळ होता. आम्ही सगळ्यांनी कपडे बदलले आणि पाण्यात खेळू लागलो. परंतु आरोपीने एका विद्यार्थिनीचा पाय धरला आणि तिला खेचू लागला. तिने नकार देताच आरोपीने सगळ्यांना पाण्यातून बाहेर येण्यास सांगितलं आणि रांगेत उभं केलं आणि मुलींच्या छातीकडे टक लावून तो पाहत होता. यामुळे आम्हाला खूप विचित्र वाटत होतं.’
वारंवार खांद्यावर हात फिरवत होता…
मुलीने आणखी पुढे धक्कादायक माहिती दिली. तिने सांगितलं की, सगळे बसकडे जात असताना पाऊस पडत होता. त्यामुळे आरोपीने तिला आणि आणखी एका मुलीला आपल्या छत्रीमध्ये घेतलं. नराधम शिक्षक हा वारंवार खांद्यावर हात फिरवत होता. त्यामुळे मुलीने बसकडे धाव घेतली. या आरोपी प्रशिक्षकाचे कारनामे इथेच संपत नाही तर बसमध्ये दुसरी मुलगी शूज घालण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने तिचाही विनयभंग केला, असेही तिने सांगितले.
आरोपीने चेहरा आणि ओठांवर हात फिरवला…
मुलीने पुढे सांगितले की, परतत असताना ती बसच्या पुढील सीटवर झोपली होती आणि त्यावेळी तिला कोणीतरी स्पर्श करत असल्याचे जाणवले. तिने सांगितले की, आरोपीने चेहरा आणि ओठांवर हात फिरवला आणि तिचे लैंगिक शोषण केले. मुलीने सांगितले की तिने त्याला ढकलले. घरी आल्यावर तिने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर पालकांनी शहर पोलीस आयुक्तांना पत्र दिले. एफआयआर नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली. पण जानेवारी २०१७ मध्ये त्यांना जामीन मंजूर झाला होता.