म. टा. प्रतिनिधी, पुणे : बोट चोखताना तीन महिन्याच्या बाळाच्या पोटात सोन्याची अंगठी गेली. ही बाब लक्षात आल्याने बाळाची आई आणि कुटुंबीयांची धांदल उडाली. बाळाला तातडीने भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. बाळाचे वय आणि प्रकृती याचा विचार करून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया टाळून एन्डोस्कोपीद्वारे अंगठी बाहेर काढली. बाळ सुखरूप असल्याचे सांगितल्यानंतर आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला.
धनकवडी येथील दाम्पत्याने बाळाच्या हातात अंगठी घातली होती. रविवारी रात्री बाळ बोट चघळत असताना ही अंगठी त्याच्या पोटात गेली. त्यानंतर तातडीने बाळाला भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. एक्स-रे केल्यावर ही अंगठी बाळाच्या जठरामध्ये असल्याचे स्पष्ट झाले. बाळाचे वय पाहता शस्त्रक्रिया टाळून एन्डोस्कोपीद्वारा ही अंगठी काढता येईल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर रात्री दहा वाजता गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दादासाहेब मैंदाड यांना रुग्णालयात बोलवण्यात आले.

अवघ्या तीन महिन्यांच्या बाळावर एन्डोस्कोपी करण्यासाठी त्याला भूल देणे गरजेचे होते. बाळाला भूल देताना विशेष काळजी घ्यावी लागते. ही जबाबदारी भूलतज्ज्ञ डॉ. नेहा टिळक यांनी यशस्वीपणे पार पाडली. लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात डॉक्टरांची टीमही तयार ठेवण्यात आली होती.
बाळाला आईने नुकतेच दूध पाजल्याचे एन्डोस्कोपी थिएटरमध्ये नेल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे बाळाच्या जठरातील अंगठी काढता येणार नव्हती. रात्री एकपर्यंत वाट पाहिल्यानंतर एन्डोस्कोपीद्वारा यशस्वीपणे ही अंगठी काढण्यात आली.
गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दादासाहेब मैंदाड म्हणाले, ‘अंगठी पोटात गेल्याचे लवकर लक्षात आले नसते, तर बाळाचे नाजूक जठर फाटण्याची शक्यता होती. ही बाब लगेच लक्षात आल्याने योग्य उपचार करता आले. बाळ आता सुखरूप असून, त्याला देखरेखीखाली ठेवले आहे.’