ही अत्यंत विचित्र घटना वाचून तुम्हालाही आश्चर्य नक्कीच वाटेल आणि चीडही येईल. लग्नात सोन्याची अंगठी आणि चेन न दिल्याने या नवरदेवाला राग आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे लग्नानंतर वधूला सासरी नेण्याऐवजी त्याने तिला अर्ध्या रस्त्यातून तिला माहेरी आणून सोडले.
सोन्याची चेन आणि अंगठीसाठी नवरदेवाचा प्रताप
हे प्रकरण उत्तर प्रदेशातील आझमगडमधील आलमपूर गावातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वऱ्हाडी नवरदेवासह आले आणि लग्न सोहळा सुरळीत पार पडला. पूर्ण विधी आणि थाटामाटात लग्न पार पडले. सर्व काही व्यवस्थितरित्या पार पडले. पण सोन्याची अंगठी आणि चेन न मिळाल्याने नवरदेवाला राग आला होता आणि त्यानंतर तो नाराज होऊन गाडीत बसून राहिला. यानंतर कुटुंबीयांनी वधूची तयारी केली आणि तिची सासरी पाठवणी केली. संतापलेल्या नवरदेवाने रस्त्यातून सासरच्या मंडळींना फोन केला आणि सोन्याची अंगठी-चेन न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच, वधूला परत पाठवण्याची धमकी देऊ लागला.
नवरदेवाने केवळ धमकीच दिली नाही, तर त्याने वधूसह रस्त्यातून युटर्न घेतला आणि तिला माहेरी घेऊन आला. सासरच्यांशी भांडण झाल्यावर वधूने स्वतः हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. एवढ्या गदारोळानंतर वधू पक्षाने वर पक्षाला लग्नात झालेल्या खर्चाची मागणी केली आणि हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. मात्र, नंतर पंचायतने मध्यस्थी केली आणि कशीबशी तडजोड झाली. अखेर हे लग्न रद्द करण्यात आलं. भेटवस्तू म्हणून देण्यात आलेल्या सामानासोबतच वर पक्षाने वधू पक्षाला सुमारे दोन लाख रुपये परत केले.