अहमदाबाद: शेवटच्या षटकात १३ धावांची गरज, समोर मोहित शर्मा, त्याच्या अचूक माऱ्यापुढे मोठे फटके खेळता येईनात. पहिल्या ४ चेंडूंमध्ये केवळ ३ धावा निघालेल्या. शेवटच्या २ चेंडूंवर १० धावांची गरज. सामना चेन्नईनं गमावल्यात जमा. पण रविंद्र जाडेजानं पाचवा चेंडू लाँग ऑनला भिरकावला. खणखणीत षटकार. पुढच्या चेंडूवर मोहितनं यॉर्करचा प्रयत्न केला. पॅडवर आलेला चेंडू जाडेजानं अचूक टाईम केला आणि चेंडू सीमारेषेपार. संघाला सनसनाटी विजय मिळवून दिल्यानंतर जाडेजा थेट कॅप्टन कूल धोनीकडे धावला. धोनीनं उचलून घेत त्याच्या छोटेखानी, पण महत्त्वाच्या इनिंगचं कौतुक केलं.गेल्या अनेक वर्षांपासून धोनीच्या नेतृत्त्वाखाली सीएसकेकडून खेळतोय. पण यंदाच्या आयपीएलमध्ये त्याला काहीसा विचित्र अनुभव आला. यंदा धोनी जाडेजाच्या नंतर फलंदाजीला यायचा. धोनीच्या निवृत्तीची चर्चा असल्यानं चाहत्यांना त्याची फलंदाजी पाहायची होती. त्यामुळे चाहते मंडळी जाडेजा आऊट होण्याची वाट पाहायचे. जाडेजा आणि धोनी फलंदाजी करत असले की धोनी स्ट्राईकला आला की कल्ला व्हायचा. त्यामुळे चाहत्यांना जाडेजा स्ट्राईकवर नको असायचा. याबद्दल जाडेजानं खंत बोलून दाखवली होती. हसतहसत तो बोलून गेला. त्यावेळी त्याच्या मनातलं दु:ख अनेकांना समजलं. काल मात्र नेमक्या उलट घडामोडी घडल्या. तेराव्या षटकात अंबाती रायुडू बाद झाला आणि धोनी फलंदाजीला आला. धोनी जाडेजाच्या आधी फलंदाजीला आला होता. पण पहिल्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. यानंतर आलेल्या जाडेजानं संघाची नय्या किनाऱ्याला लावली. संपूर्ण हंगामात चाहत्यांना जाडेजापेक्षा धोनीची फलंदाजी पाहण्यात रस होता. त्याच जाडेजानं काल संघाला आयपीएलचं जेतेपद जिंकवून दिलं. सामना जिंकल्यावर जाडेजा थेट धोनीच्या दिशेनं धावत गेला.जवळपास हातून निसटलेला सामना जाडेजानं जिंकून दिला. त्यामुळे पळत आलेल्या जाडेजाला धोनीनं मिठी मारली. त्याला उचलून घेतलं. त्यावेळी धोनीचे डोळे पाणावले होते. दोघांसाठी हा क्षण अविस्मरणीय होता. त्याचे फोटो व्हायरल झाले. आता हाच फोटो जाडेजानं इन्स्टाग्रामवर डीपी ठेवला आहे. धोनी आणि जाडेजामध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा आयपीएलदरम्यान सुरू होत्या. पण कालच्या एका मिठीनं त्या सगळ्या शंका दूर झाल्या. धोनी आणि जाडेजाचं नातं अतूट आणि घट्ट असल्याचं काल दिसून आलं.