तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन
जुन्नर तालुक्यातील सुलतानपूरच्या महेंद्र देवकर याने जुन्नर तालुक्याच्या तहसीलदारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी संचेती रुग्णालयाच्या समोरील पुलावर आंदोलन केलं. वारंवार अर्ज देऊनही जमिनीच्या खातेदाराच्या नावाच्या नोंदी न केल्याने महेंद्र देवकर याने उद्विग्न होऊन तहसीलदारांविरोधात आंदोलन छेडलं. जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही. मी पुलावरुन उडी मारणार, असा पवित्रा संबंधित तरुणाने घेतला.
सिन्नलला प्रचंड वाहतूक कोंडी, बघ्यांची प्रचंड गर्दी
दुपारी साडे चारच्या आसपास संबंधित तरुण पुलावर चढला. हा तरुण नेमका कशासाठी पुलावर चढला, हे थोड्या वेळासाठी कुणाला काही कळेना. नंतर त्याने त्याची मागणी मोठ्या आवाजात सांगितली. जुन्नरच्या तहसीलदारांवर कारवाई झालीच पाहिजे, जर कारवाई झाली नाही तर मी इथून उडी मारून आत्महत्या करेन, असा पवित्रा घेऊन त्याने जोरजोरात घोषणाबाजी केली.
सिग्नलवर असलेल्या बाईकस्वरांनी गाड्या बाजूला घेऊन संबंधित प्रकार काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेकडो दुचाक्या एकाच जागेवर थांबल्या. अर्धा तास मोठी वाहतूक कोंडी झाली. तोपर्यंत पोलिसांना या आंदोलनाची खबर लागली होती. पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांनी तरुणाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो पोलिसांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. माझ्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत, नाहीतर मी इथून उडी मारणार, यावर तो ठाम होता.
दरम्यान, सध्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले आहेत. तरुणाला पुलावरुन खाली उतरविण्यासाठी जवान प्रयत्न करत आहेत. पण तूर्तास तरी तरुण पुलाच्या खाली उतरलेला नाहीये.