संगमनेर सहकारी साखर कारखान्यावर कामगार नेते विलास उबाळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री थोरात यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी थोरात यांच्याकडे अहमदनगर लोकसभा मदतदारसंघाचा विषय काढला. यामुळे नगर दक्षिणमध्ये वेगळ्या राजकारणाला तोंड फुटले आहे. एक तर राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा काँग्रेसला सोडणार का? सोडली तर थोरात निवडणूक लढविणार का? तसे झाले तर नेहमी उत्तर भागात रंगणारा विखे विरूद्ध थोरात सामना दक्षिणेतही रंगणार का? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
यासंबंधी काळे यांनी सांगितले की, दोन जूनला मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यात नगर दक्षिणेचाही आढावा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही थोरात यांची भेट घेतली. या मतदारसंघात थोरात यांनीच काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी करावी, अशी मागणी शहरातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने त्यांच्याकडे केली.
थोरात राज्यातील विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत. राज्याच्या राजकारणात सुसंस्कृत आणि विकासात्मक व्हिजन असणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अलीकडच्या काळात माजी खासदार तुकाराम गडाख वगळता राष्ट्रवादीला या मतदारसंघात सातत्याने अपयश आलेले आहे. विधानसभेच्या दक्षिणेतील सर्व जागा राष्ट्रवादी लढते आहे. दक्षिणेतील काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय मिळायचा असेल तर दक्षिणेची लोकसभेची जागा काँग्रेसने लढवली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असं काळे म्हणाले.
सध्या देशात राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची घोडदौड सुरू आहे. मोदींना सक्षम पर्याय मिळाला आहे. भाजपच्या विद्यमान खासदारांनी शहरासह दक्षिणेतल्या मतदारांचा भ्रमनिरास केला आहे. थोरात यांनी जिल्ह्याचे नेतृत्व दिल्लीत जाऊन करावे, अशी नगर जिल्ह्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं काळे यांनी सांगितलं.