चेन्नईच्या विजयानंतर सगळेच जण ‘यलो आर्मी’ला शुभेच्छा देत आहेत, त्यांचं अभिनंदन करत आहेत. पण चेन्नईच्या संघमालकांना काय वाटतं? पाचव्यांदा विजेतेपदानंतर त्यांच्या काय भावना आहेत? याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. अखेर चेन्नईच्या संघमालकांची प्रतिक्रिया समोर आलीये. धोनी है तो मुमकिन हैं… अशा ‘रॉयल’ अंदाजात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
CSK चॅम्पियन होताच मालकांची कॉलर टाईट
चेन्नईचे मालक श्रीनिवासन यांनी मंगळवारी सकाळी धोनीशी संवाद साधला. या शानदार विजयासाठी त्यांनी धोनीचं आणि त्याला साथ दिलेल्या सगळ्या ‘यलो आर्मी’च्या खेळाडूंचं खास अभिनंदन केलं. श्रीनिवासन यांनी धोनीला दिलेला संदेश खास पीटीआयशी शेअर केला. श्रीनिवासन धोनीला म्हणाले, “महान कर्णधार… तुम्ही चमत्कार केलात. हे फक्त तुम्हीच करू शकता. आम्हाला खेळाडू आणि संघाचा अभिमान आहे”.
गेल्या काही दिवसांत लागोपाठ सामने खेळलेल्या धोनीला विश्रांती घेण्याचा सल्ला श्रीनिवासन यांनी दिला तसेच संघाचा विजय साजरा करण्यासाठी संघासह चेन्नईला येण्याचे निमंत्रणही दिले. श्रीनिवासन म्हणाले, “हा हंगाम असा होता जिथे चाहत्यांनी दाखवून दिले की ते महेंद्रसिंग धोनीवर किती प्रेम करतात… आमचंही धोनीवर तितकंच प्रेम आहे..”
घरात घुसून चेन्नईने गुजरातला पाणी पाजलं
आयपीएल २०२३ चा चेन्नई आणि गुजरात यांच्यातील अंतिम सामना २८ मे, रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेळापत्रकानुसार खेळवला जाणार होता, परंतु त्या दिवशी मुसळधार पाऊस पडला आणि सामना होऊ शकला नाही. त्यामुळे तो सामना राखीव दिवशी खेळविण्यात आला. राखीव दिवशीही पावसाने सामना विस्कळीत केला होता. पहिल्या डावाचा खेळ पूर्ण झाला आणि सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २१४ धावा केल्या, परंतु सीएसकेने फलंदाजीला सुरुवात करताच पुन्हा एकदा पावसामुळे खेळ थांबवावा लागला. अशा परिस्थितीत, सामना १२ वाजता उशिराने सुरु झाला. चेन्नईला डकवर्थ लुईसप्रमाणे १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य दिलं गेलं जे यलो आर्मीने शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले.