मुंबई : मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिच्या अपघाती निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मालिकेतील जॅस्मिनच्या भूमिकेतून वैभवीने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. हिमाचल प्रदेशात झालेल्या कार अपघातात वैभवीला प्राण गमवावे लागले. यावेळी तिच्यासोबत तिचा होणारा पती जय गांधीही होता. वैभवीच्या निधनानंतर जयने सोशल मीडियावरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.”आपण परत भेटेपर्यंत… तुझ्या त्या खास आठवणी नेहमीच माझ्या चेहऱ्यावर हास्य फुलवत राहतील. जर तू थोड्या वेळासाठीही परत येऊ शकलीस, तरी आपण नेहमीप्रमाणे बसून बोलू शकतो. तू माझ्यासाठी कायमच सर्वस्व होतीस आणि नेहमीच राहशील. तू आता इथे नाहीस, ही वस्तुस्थिती मला नेहमीच वेदना देत राहील, परंतु आपण पुन्हा भेटेपर्यंत तू कायम माझ्या हृदयात नेहमीच असशील…तुझ्या आत्म्यास शांती लाभो प्रिये” अशा आशयाची पोस्ट जयने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
वैभवीने मृत्यूच्या आधी पोस्ट केलेला अखेरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ‘सगळं काही बाजूला ठेवून थोडा वेळ थांबा आणि मोकळा श्वास घ्या.. कारण आयुष्यातला प्रत्येक क्षण आपण जगून घ्यायला हवा..’ अशा आशयाची कॅप्शन तिने दिली होती. तिच्या मृत्यूनंतर ही पोस्ट वाचून सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. मृत्यूच्या अवघ्या १६ दिवसांपूर्वी लिहिलेली पोस्ट योगायोग आहे की दुसरं काही, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये वाग्दत्त पती जय गांधी सोबत फिरायला गेलेल्या अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या कारला भीषण अपघात झाला होता. यात वैभवीचा मृत्यू झाला. सीटबेल्ट न लावल्याने वैभवीला प्राण गमवावे लागल्याची चर्चा होती, मात्र जयने ती फेटाळून लावली होती.