घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. ३५ वर्षीय राणी असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिच्यासोबत राहणाऱ्या ३६ वर्षीय सपनाला संशयाच्या आधारे ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
दारु प्यायल्यानंतर दोघींमध्ये भांडण
राणी आणि सपना या दोघी भाड्याच्या घरात राहत होत्या. राणी गुडगावमधील ब्युटी पार्लरच्या दुकानात काम करायची आणि सपना पार्टींमध्ये वेटर/डेकोरेटर म्हणून काम करायची. तिचा घटस्फोट झाला असून तिला एक मुलगीही आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना आणि राणी या त्यांच्या नेहा नावाच्या मैत्रिणीच्या घरी रात्री मित्रांसोबत दारु पार्टी करत होत्या. यादरम्यान, सपना आणि राणीमध्ये भांडण झाले. पार्टीनंतर दोघीही त्यांच्या फ्लॅटवर परतल्या आणि पुन्हा दारुचं सेवन करु लागल्या.
पहाटे साडेचारच्या सुमारास पुन्हा त्यांच्यात वाद होऊन हे भांडण हाणामारीपर्यंत पोहोचलं. यादरम्यान, सपनाने भाजी कापण्याच्या चाकूने राणीच्या छातीवर वार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
वडिलांना शिवीगाळ करण्यावरुन वाद
पोलिसांच्या चौकशीत सपनाने सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. राणीने तिच्या वडिलांना शिवीगाळ केली होती. यामुळे ती संतापली. त्यांच्यात वाद झाला आणि मग रागाच्या भरात तिने राणीवर चाकूने वार करुन तिचा खून केला. सपनावर ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.