या दोन्ही मेट्रोंचे संचालन मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत (एमएमआरडीए) महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ (एमएमएमओसीएल) ही कंपनी करते. कंपनीने मेट्रो प्रवाशांची प्रवासादरम्यान तसेच स्थानक परिसरात सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सोमवारी महत्त्वाचे पाऊल उचलले. याअंतर्गत या दोन्ही मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व प्रवाशांना वार्षिक सर्वसमावेशक विमा पॉलिसी महामुंबई मेट्रोमार्फत देण्यात येणार आहे.
या विमा योजनेनुसार अनपेक्षित घटनांमुळे दुर्घटनाग्रस्त प्रवासी रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला कमाल १ लाख रुपये व बाह्यरुग्णांसाठी (ओपीडी) १० हजार रुपयांपर्यंतची नुकसानभरपाई मिळणार आहे. तसेच प्रवासी बाह्यरुग्ण उपचार आणि रुग्णालयात दाखल असल्यास, रुग्णालयातील संरक्षणाव्यतिरिक्त ओपीडीचा कमाल खर्च १० हजार रुपयांपर्यंत दिला जाणार आहे. किरकोळ दुखापतीच्या भरपाईसह वैद्यकीय खर्चाअंतर्गत कमाल ९० हजार रुपये इतकी भरपाई देण्यात येणार आहे. अपघातांदरम्यान प्रवाशांचा मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये नुकसानभरपाई मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कायमचे किंवा आंशिक अपंगत्व आल्यास ४ लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई या विम्याअंतर्गत मिळू शकणार आहे.
कोणाला मिळणार विमाकवच?
एमएमएमओसीडब्ल्यूनुसार, ही पॉलिसी ज्या प्रवाशांकडे वैध तिकीट/पास/स्मार्ट कार्ड/क्यूआर कोड/वैध परवानगी असेल अशा सर्वांना लागू असेल. तसेच हे विमाकवच मुंबई मेट्रो स्थानकाची इमारत, फलाट किंवा रेल्वेमध्ये किंवा स्थानक परिसरात अशा सर्व ठिकाणी वैध असेल. पण मेट्रो स्टेशन इमारतीच्या बाह्य क्षेत्रात काही अनिश्चित घटना/अपघात घडल्यास या विमा योजनेचे संरक्षण त्या व्यक्तीला लागू होणार नाही.