म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मान्सूनचा प्रवास आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर मंगळवारी संपूर्ण अंदमान आणि निकोबार, अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पुढे सरकला. हा पाऊस महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर कधी येईल, अशी प्रतीक्षा वाढत्या आर्द्रतेमुळे आणि त्यामुळे वाढणाऱ्या अस्वस्थतेमुळे मुंबईकरांना आहे. मात्र त्या आधी राज्यात मान्सूनपूर्व सरी येतील, असा अंदाज वर्तवल्याने उकाड्यापासून दिलासा कधी मिळेल, असा प्रश्न विचारला जात आहे. मुंबईत सध्या तापमानाचा पारा चढा नसला तरी आर्द्रता, अधूनमधून ढगाळ वातावरण यामुळे वातावरण त्रासदायक होत आहे.

मुंबईचे कमाल तापमान सोमवार आणि मंगळवार दोन्ही दिवस ३४ ते ३५ अंशांदरम्यान होते. सांताक्रूझ येथे मंगळवारी ३४.६ तर कुलाबा येथे ३४.२ अंश सेल्सिअस तापमान होते. सोमवारी हे तापमान सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही ठिकाणी ३४.४ होते. कुलाबा येथे ६८ टक्के तर सांताक्रूझ येथे ६२ टक्के आर्द्रता होती. मुंबईतील स्वयंचलित यंत्रणेच्या नोंदीनुसार माटुंगा येथे मंगळवारी ४० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. राम मंदिर येथे ३६.४, मिरा रोड येथे ३६.६, जुहू विमानतळ येथे ३६.३, मुंबई विमानतळ येथे ३४.२, महालक्ष्मी येथे ३४.७ अशा तापमानाची नोंद झाली.

मुंबईत मोदींच्या हस्ते झालेल्या उद्घाटन सोहळ्यात पैशांचा चुराडा; एका दिवसात BMCचे ८ कोटी खर्च

वाऱ्यांची दिशा, आर्द्रता, ढगाळ वातावरणाने हे तापमान अधिक असल्याची जाणीव करून दिली. मंगळवारी वाऱ्यांची दिशा उत्तरेकडून होती. जमिनीवरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमान आणि आर्द्रता कमी असली तरी उकाडा मात्र अधिक जाणवत होता. ही अवस्था आठवड्याच्या अखेरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांमध्ये वाऱ्यांची दिशा किंचित बदलेल. वायव्येकडूनही वारे येतील. मात्र हे वारे उत्तर आणि वायव्य दिशेकडून येत असल्याने अस्वस्थता कमी होण्याची शक्यता फारशी नाही, असे प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत मुंबईमध्ये पश्चिमेकडून वारे येणार नाहीत, तोपर्यंत तापमानात घट किंवा उकाड्याच्या जाणीवेत घट होण्याची शक्यता नाही. यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

या आठवड्यात मराठवाड्यावरून जाणारा पश्चिमी प्रकोप आणि ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे सोमवार, मंगळवार दोन दिवस राज्यात काही भागांमध्ये पाऊस पडला. राज्यात काही ठिकाणी गाराही पडल्या. मात्र पश्चिमी प्रकोप स्थिती पुढे सरकली असून आता पुढील चार ते पाच दिवस फारशा पावसाची शक्यता नाही. ५ जूनला अरबी समुद्रात एक प्रणाली तयार होत असून त्यामुळे कदाचित मान्सूनपूर्व सरी अनुभवता येतील, असा अंदाज आहे. मात्र ही प्रणाली कशी प्रवास करते यावर पावसाची शक्यता अवलंबून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here