तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी साहिल वारंवार आपला जबाब बदलत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याने १५ दिवसांपूर्वी चाकू खरेदी केल्याचे सांगितले. त्याने तो कोठून खरेदी केला, याचा शोध पोलिस घेत आहेत. ‘तपासाचा हा प्राथमिक टप्पा असल्याने त्याने दिलेल्या जबाबांची पडताळणी केली जात आहे. कधी कधी तो म्हणतो की त्याने तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, ज्यामुळे तो चिडला,’ असेही पोलिसांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील एका ठिकाणी साहिलच्या मावशीने साहिलच्या वडिलांना फोन केल्यानंतर बुलंदशहर येथून त्याला अटक करण्यात आली. तेथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सोमवारी सायंकाळी उशिरा त्याला दिल्लीत आणण्यात आले. त्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दहा लाख रुपयांची मदत
नवी दिल्ली : शाहबाद डेअरी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली. मृत मुलीच्या कुटुंबीयांना दिल्ली सरकार दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करेल आणि दोषी पक्षाला न्यायालयाच्या माध्यमातून कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे केजरीवाल यांनी ‘ट्विटर’वर सांगितले.
भाजप नेत्याची भेट
नवी दिल्ली : भाजपचे खासदार हंसराज हंस यांनी मंगळवारी शाहबाद डेअरी परिसरात मारल्या गेलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना आर्थिक मदत केली. ‘कितीही मदत केली तरीही या कुटुंबीयांचे नुकसान भरून न येणारे आहे. या कुटुंबाने आपले सर्वस्व गमावले आहे. मात्र, या कुटुंबाला जेवढी शक्य झाली तेवढी मदत मी केली आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.