वृत्तसंस्था, इम्फाळ/चुराचंदपूर: गेल्या काही दिवसांतील हिंसाचाराची सर्वाधिक झळ बसलेल्या मणिपूरमधील चुराचंदपूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी भेट दिली. गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख, गृहसचिव यांच्यासह शहा येथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी काही चर्चचे नेते, कुकी समुदायातील विचारवंत यांच्याशी चर्चा केली. राज्यात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि समस्या, तक्रारी जाणून घेण्यासाठी त्यांनी बैठक घेतली.मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मैतेई आणि कुकी समुदायामध्ये संघर्ष सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शहा मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत. बैठकीपूर्वी मंगळवारी सकाळी सरकारच्यावतीने या हिंसाचारात जीव गमावलेल्यांच्या वारसांना दहा लाख रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीही देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि शहा यांच्या सोमवारी रात्री झालेल्या बैठकीमध्ये मदतीबाबत निर्णय घेण्यात आला. हिंसाचारग्रस्त भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले. उपलब्धतेअभावी गगनाला भिडलेल्या किंमती कमी होण्यास त्यातून मदत होणार आहे.

महिला नेत्यांची भेट

इम्फाळ : शहा यांनी मंगळवारी दिवसभराच्या भेटीगाठीची सुरुवात महिलांच्या गटाबरोबरील चर्चेने केली. मणिपूरमधील महिला नेत्यांकडून त्यांनी परिस्थिती जाणून घेत चर्चा केली. ‘मणिपूरमधील महिला नेत्यांच्या गटाची बैठक घेतली. मणिपूरमधील समाजामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचा पुनरुच्चार केला. आम्ही एकत्रित राज्यात शांतता आणि समृद्धीसाठी कटिबद्ध आहोत,’ असे ट्वीट शहा यांनी केले.

ममता मणिपूर भेटीवर?

कोलकाता : मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागातील नागरिकांच्या पाठीशी उभे राण्याची इच्छा असून त्यासाठी तेथे जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून केली. बॅनर्जी या मणिपूरमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मणिपूरसारखा हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये घडवून आणण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे, असा आरोप ममता यांनी मागील आठवड्यात केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here