बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव येथील एका शेतातील घरावर सात ते आठ जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकला. तसंच चाकूच्या धाकावर सोने नाणे आणि रोख रकमेची लूट केली. यात एका युवकासह दोन महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव येथील शेत शिवारात असलेल्या तायडे यांच्या घरावर दुचाकीने आलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी चाकूच्या धाकावर हल्ला चढवला. महिलांच्या अंगावरील दागिने काढत पैशांची लूट केली. यावेळी घरातील काही महिलांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकू हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत एका २४ वर्षीय युवकासह दोन महिला गंभीर जखमी झाल्या.
जखमींमध्ये वैभव मारुती तायडे, ज्योती मारुती तायडे, सुधाबाई विजय तायडे यांचा समावेश असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे देखील हजर झाले. जखमींना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनास्थळी गुन्ह्यात वापरलेली एम एच २८ एटी १८७९ या क्रमांकाची दुचाकी आढळून आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या दरोडामुळे संपूर्ण गावांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. पोलीस आता या दरोडा प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या कधी आवळतात याकडे लक्ष लागलं आहे.