इराणसमर्थक मिलिशियाने याआधी ५ जानेवारी रोजी बगदादच्या ग्रीन झोनवर कत्युशा क्षेपणास्त्रे डागली होती. अमेरिकेच्या दूतावासाला या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. तशाचप्रकारे बुधवारी उशिरा रात्री हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला नेमका कुणी केला, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
रॉयटरच्या वृत्तानुसार, हल्ल्यानंतर ग्रीन झोनमध्ये सायरन वाजवण्यात येत होता. ग्रीन झोनमध्ये अमिरेकेचे दूतावास असून त्यापासून अवघ्या १०० मीटरवर दोनपैकी एक क्षेपणास्त्र येऊन कोसळल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. दोन मोठ्या स्फोटांचा आवाज झाल्याचेही सांगण्यात आले.
इराणचा अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला
जनरल कासीम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर खवळलेल्या इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन तळांवर मंगळवार व बुधवार दरम्यानच्या रात्री २२ क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये सुमारे ८० अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. याशिवाय मानवरहित विमाने, हेलिकॉप्टर आणि इतर लष्करी सामग्रीचेही मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला. ‘रिव्होल्युशनरी गार्ड’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका आणि आघाडीची १४० ठिकाणे हल्ल्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत. अमेरिकेने पुन्हा चूक केल्यास त्यांना लक्ष्य केले जाईल, असा इशाराही इराणने दिला आहे. त्यामुळेच आधीच तणाव वाढला असताना बगदादच्या ग्रीन झोनवरील ताज्या हल्ल्यानंतर स्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times